देवेंद्र फडणवीस अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व अभ्यासू राजकारणी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस. आपला वाढदिवस जाहिराती, होर्डिंग्ज न लावता सामाजिक उपक्रम राबवून, रक्तदान, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण आणि गरजूंना मदत करून साजरा करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस दरवर्षी करतात. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर रक्तदान व आरोग्य शिबिरे घेतली जातात. यावर्षी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरदेखील राबविण्यात येत आहे. यात महसूल विभागाची कामे त्वरित मार्गी लावणे, कुंभार समाजास मोफत माती उपलब्ध करून देण्याकरिता पास देणे आणि महसूल विभागाची प्रलंबित कामे त्वरित सोडविणे, अशा विविध उपक्रमांद्वारे हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस हे उच्चविद्याविभूषित, अष्टपैलू, अभ्यासू आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांत तरुण नगरसेवक, सर्वांत तरुण महापौर, तरुण वयात आमदार आणि मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष अशा एक एक राजकीय पायर्‍या चढत आज ते तिसर्‍यांदा महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवक ते मुख्यमंत्री हा राजकीय प्रवास जवळून पाहण्याचा योग मला आला आहे.
नागपूरचे महापौर असताना तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेते असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना या मोर्चात बोलावण्यात आले होते. न भूतो न भविष्यतो असा हा मोठा मोर्चा होता. नागपूरकडे जाणारे रस्ते व रेल्वे मोर्चेकर्‍यांनी भरलेले दिसत होते. तेव्हा वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाची जातीने विचारपूस देवेंद्रजी करत होते. संघ कार्यालय आणि धर्मशाळा पूर्ण भरल्या होत्या. पण देवेंद्रजींनी महाराष्ट्रातून आलेल्या मोर्चातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.
पक्ष संघटनेकडे आजही देवेंद्रजी बारकाईने लक्ष देतात. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हाचा एक प्रसंग प्रकर्षाने आठवतो. त्यांचा पदग्रहण सोहळा मुंबई येथील षण्मुखानंद हॉल येथे ठरला होता. गोपीनाथराव मुंडे, नितीनजी गडकरींसह सर्व दिग्गज नेते त्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण पक्ष संघटनेकरिता व पक्ष सत्तेवर आणण्याकरिता अत्यंत प्रेरणादायी होते. व्यासपीठ व सभागृहातील पदाधिकार्‍यांना उद्देशून ते वारंवार बोलत असत की, “पक्ष सत्तेवर आणायचा असेल तर नो कॉम्प्रमाइज,” नो कॉम्प्रमाइज म्हणजे आपल्यातील लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत लढताना आणि राजकारण करताना विरोधकांशी हातमिळवणी करता कामा नये असा त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असावा, असे मला वाटते. कारण त्यांनी स्वतः त्यांच्या आक्रमक शैलीने आणि शब्दांच्या फटकेबाजीने अनेक वेळा विरोधी पक्षांना निरुत्तर केल्याचे पहायला मिळते. जरी त्यांची सर्वपक्षीय मैत्री व संबंध असले, तरी जेव्हा ते राजकीय रणांगणात उतरतात तेव्हा ते पूर्ण अभ्यास करून व आक्रमकपणे लढतात. कोणताही विषय ते पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडतात. त्यामुळे विरोधक त्यांच्यापुढे निरुत्तर होतात.
देवेंद्र फडणवीस यांच्यातील एक गुण वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्याकडे सर्वसामान्य लोक जेव्हा समस्या व अडचणी घेऊन जातात तेव्हा त्या सोडवण्याचे उत्तम कौशल्य त्यांच्याकडे आहे. एखादा महत्त्वाचा, गंभीर प्रश्न असेल आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मोबाइलवर टेक्स्ट मेसेज केला, तर त्या विषयाचे गांभीर्य ओळखून ते तो प्रश्न मार्गी लावतात. तसेच आवश्यक असेल तर मेसेज किंवा फोन करून त्याची समोरच्या व्यक्तीला माहिती देतात.
महाराष्ट्रात अनेक विकासकामे वेगाने सुरू आहेत. त्या सर्व कामांचा आढावा घेणे आणि ती वेळेत पूर्ण करणे हा त्यांचा नेहमीच आग्रह असतो. पक्ष विस्तार, संघटन व बांधणी याकडे ते बारकाईने लक्ष देतात. त्यांच्या मते, उत्तम पक्षबांधणी व संघटन असेल तरच पक्ष सक्षम बनतो आणि जो पक्ष सक्षम असतो, तोच सत्तेत येतो. त्यामुळे ते सर्वांत जास्त लक्ष पक्ष संघटनेकडे देतात. राजकीय वारसा आणि बाळकडू कुटुंबाकडून जन्मताच जरी मिळत असले, तरी स्वतःमध्ये जर प्रबळ इच्छाशक्ती नसेल तर तो वारसा यशस्वी होत नाही. आज तरी महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. ते कार्य त्यांच्या हातून असेच पूर्णत्वास जावो. याकरिता त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Devendra Fadnavis: A multifaceted personality and a studious politician.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *