संशयात्मा विनश्यती

– वासवदत्ता अग्निहोत्री

श्रीभगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात चाळीसावा श्लोक आहे, त्यात संशय हा मानवासाठी किती घातक असतो ते सांगण्यात आले आहे. दुविधा, अविश्वास आणि शंका किंवा शक या शब्दप्रयोगात आपण सर्वचजण हा शब्द ओळखतो. गीतेत विस्तृत विवेचन करून, कुरुक्षेत्रावर, महाभारताच्या युद्धात, द्विधा
मनःस्थितीत असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण समजावून सांगत आहेत की, जो अज्ञानी आणि श्रद्धाहीन आहे, जो नेहमीच शंका-कुशंका यांंनी वेढलेला आहे, त्याचे ढासळणे निश्चित आहे. संशयग्रस्त मनाची घालमेल, त्यात निर्णय घेण्याची योग्यता प्रभावित होणे, मानसिक संतुलन हरवणे आणि नकारात्मक विचार येणे हे होते. एक नुसत्या संशयाने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
कौटुंबिक जीवनात संशय हा अनेकवार फार घातक सिद्ध होतो. पती-पत्नीचे परस्परसंबंध, एकमेकांवर संशय घेतल्याने दुरावतात, संपुष्टात येतात. पतीसाठी हा संशय फार घातक आहे. नव्याने संबंध झाल्यामुळे अनेक सवयी अशा असतात ज्या पटत नाहीत. पुन्हा परस्पर विश्वास अर्जित करण्यात ही संशय उत्पन्न झाला तर त्रासच. एकमेकांच्या मित्र, मैत्रिणींबरोबरचे संबंध प्रगाढ असणे हे संशयाचे कारण होऊ शकते. साहित्यिक या विषयावर खूप कथा, नाटकं लिहितात. अनेक चित्रपटही या विषयावर झालेत आणि गाजलेत. साध्या गोष्टीत संशय निर्माण झाला की ती गोष्ट विक्राळ रूप घेते आणि नातेसंबंध बिघडवून टाकते. ज्यांचा स्वभावच संशयी असतो, त्यांना कुठल्याही गोष्टीत पुरावा लागतो आणि जर का तो जास्तच संशयी असेल तर पुरावादेखील पुरा पडत नाही. संशयी व्यक्ती अनेकवार मोठ्या पदावर काम करू शकत नाहीत. राजनयिक किंवा कुठल्याही निर्णयक्षम पदावर जास्त टिकू शकत नाहीत. अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या जागेवर कधी पोहोचले तरी आपल्या हाताखालच्या लोकांना त्रासच देतात. सदोदित सर्वांवर संशय घेतात. कैकवेळा त्यांना त्या संशयाचे कारणही सांगता येत नाही, पण तरीदेखील संशय घेणं ते कमी करत नाहीत.
हिंदी चित्रपट, शक आपकी कसम यांचे कथानक संशयावर आधारित आहेत. चित्रपट पाहून अक्षरश अंगावर शहारा येतो की, या संशयामुळे कुणाच्या आयुष्यात कशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हसरे कुटुंब उद्ध्वस्त होते. जन्माचे नातेसंबंध क्षणार्धात मोडतात. आमच्या शेजारी नुकतेच लग्न झालेले तरुण पतीवर केवळ एकमेकांवर संशय केल्याने इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली की, त्यांच्या गृहस्थ जीवनाचा अंत झाला. दोघांनी आत्महत्या केली. दोन-तीन दिवसांनी त्यांची प्रेतं दुर्गंध सोडू लागली तेव्हा शेजारचे लोक हवालदिल झाले, त्यांना कळाले आणि त्यांचा असा अंत पाहून हळहळले.एक सुंदर संबंधाचा असा अनपेक्षित अंत फक्त संशयावर झाला.
संशय हा मेंदूपर्यंत पोहोचणारे ज्ञानाचे मार्ग अवरुद्ध करतो, मानसिक संतुलन बिघडवतो आणि पुढे जाण्याच्या मार्गावर मोठी अडचण निर्माण करतो. श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेश केला आणि जगालाही हा उपदेश जणूकाही पडला. अनेकवार माणूस स्वतःवरसुद्धा संशय करतो, हे करू की नको? हे मला करता येईल की नाही? हे खाद्यपदार्थ मला पचतील की नाही? रामायणातील एक उदाहरण किती कौतुकास्पद आहे, सीताहरण झाल्यानंतर हे माहीत झाले हे रावणाचे काम आहे आणि त्याचे वास्तव्य लंका येथे आहे.
जांबुवंत, सुग्रीव, हनुमान हे सर्व समुद्राकाठी आले. अथांग सागर समोर आता ही जलराशी पार कशी होणार. वास्तविक हनुमानात उड्डाणाचे सामर्थ्य होते, पण त्यांना याबाबत स्वतःवर संशय होता. जांबुवंत यांनी या संशयाचे निरसन केले आणि त्यांचे मनोधैर्य वाढवले आणि आश्चर्य….हनुमानाने लंकेपर्यंत झेप घेत उड्डाण केले आणि सीतामातेची खुशाली रामरायाला अर्पण केली. परमेश्वराशी आपले संबंध असेच असतात. आपण ‘त्याच्या’वर अगाध श्रद्धा ठेवतो, पण जर का त्याच्या अस्तित्वातच संशय घेतला तर त्याची कृपा आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही. संशयरहित होऊन त्याला शरण गेलो तरच आपण त्याचे कृपापात्र असू, नाहीतर आपली नास्तिकात जमाखतर होणार. लहानथोर संशय तर आपल्याला नित्य येतच असतात, पण आपण ते सोडतो आणि पुढे चालत राहतो….आयुष्यात असेच मोठे संशयदेखील सोडते घ्यावेत म्हणजेच आयुष्य सुखी होते….नाहीतरी जे अवश्य भावी आहे ते होणारच, आपले वर्तमान सुखाचे क्षण आपणच का घालवावे?

Suspect pleads

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *