संसार फुलवणार्‍या शांत सावल्या..!

– अमोल जगताप
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर शेजारून वाहणारा पाट, अंगणात दावणीला बांधलेली गुरं, घराजवळची विहीर, चुलीवर शिजणारं जेवण, रात्रीच्या चांदण्यात निजणारं अंगण अन् या सगळ्या आठवणींना आकार देणारी जर कुणी माणसं असतील, तर त्यात आजी-आजोबा, आई-वडील, तात्या यांच्याइतक्याच मोठ्या वाट्याने उभ्या राहतात त्या – आमच्या आत्या आणि काकू.. आज मागे वळून पाहिलं की जाणवतं, त्या घरात पुरुष कुटुंबाचा आधार तर होतेच; पण त्या आधाराला घरपण देणारं छप्पर या त्या स्त्रियांनीच उभं केलं होतं. आम्हा बहीण-भावंडांच्या लाडक्या तीन आत्या.. आजवर डोक्यावरचा पदर ढळू न देणार्‍या. पण आम्ही त्यांना नावाने कधी हाक मारली नाही. त्या आमच्यासाठी कायम त्यांच्या गावांच्या नावानेच ओळखल्या गेल्या – लोखंडेवाडीची आत्या, आंब्याची आत्या आणि पिंपळणार्‍याची आत्या. आज विचार केला की वाटतं, लग्नानंतर त्या ज्या गावात गेल्या, तेच गाव त्यांच्या नावाचा भाग बनलं. ते प्रेमाने जपत त्यांचं माहेरपणही मात्र कधीच कमी झालं नाही.
सर्वात मोठी होती लोखंडेवाडीची आत्या.. ती म्हणजे कणखरपणाची मूर्तीच..! आयुष्यभर वावरातल्या ढेकळांशी झुंजत, उन्हातान्हात राबत तिने स्वतःचा संसार उभा केला. तिच्या चेहर्‍यावर फारसं हसू दिसायचं नाही. पण त्याचा अर्थ ती कठोर होती असा नव्हता. तिच्या प्रेमाला शब्द नव्हते ते प्रेम तिच्या कामात होतं.. मामा अचानक गेले, त्यानंतर मुलींना तिने केवळ मोठं केलं नाही, तर त्यांना आयुष्याचा, कष्टाचा, प्रामाणिकतेचा मार्गही दाखवला. शिस्त तिच्या रक्तात होती. माझ्यावरही मात्र तिचा विशेष जीव होता.. आणि माझाही तिच्यावर..! ती आली की माझ्या डोक्यावरून हात फिरवायची. फार बोलायची नाही, पण तिच्या त्या एका स्पर्शात कितीतरी माया दडलेली असायची. बसचे पैसे वाचावेत म्हणून ती कितीतरी वेळा सासरहून माहेरी पायी यायची. आजच्या काळात असे चालण्याचा विचारही कठीण वाटतो; पण त्या काळी अनेक मैलांचा प्रवासही तिच्यासाठी कधीच ओझं नव्हतं. कारण तिच्या मनात पैशापेक्षा कुटुंब मोठं होतं. काटकसर हा तिचा फक्त स्वभाव होता; मजबुरी नव्हती. आणि त्या काटकसरीच्या बळावर तिने संसार उभा केला.. जमिनी घेतल्या.. मुलींचे लग्न केले. नंतरच्या दोन्ही आत्या म्हणजे रावळ्या-जावळ्या होत्या पण दोघींच्या स्वभावात थोडं वेगळेपण असलं, पण तरी एक गोष्ट सारखी होती- मोठेपणाचा, कामाचा, कष्टाचा कधीच गवगवा नाही. एकीने शेतातल्या ढेकळांशी झुंज देत संसार फुलवला. तिचे हात कायम मातीत अन् चुलीजवळ कामात असायचे. उन्हाने काळवंडलेला चेहरा आणि कपाळावरचा घाम पण त्या घामातही चेहर्‍यावर एक समाधान असायचं. दुसरी आत्या शहरात गेली. पण शहरात राहूनही तिने मनातलं गाव हरवू दिलं नाही. मामांना साथ आणि मुलांना संस्कार देत, संसार इतक्या शांतपणे सांभाळला की लोकांना हेवा वाटावा. या तिघीही बहिणी जेव्हा माहेरी एकत्र यायच्या, तेव्हा घरात एक वेगळीच ऊर्जा यायची. गप्पा रंगायच्या.
खळ्यावर बांगड्यांचा उत्सव रंगायचा.. तर कधी आजीच्या आठवणींचे मोहोळ उडायचे. आम्ही मुलं त्यांच्या भोवती बसून त्या सगळ्या गप्पा ऐकत राहायचो. त्या हसायच्या, चिडवायच्या, भूतकाळात रमायच्या आणि आम्हाला नकळत नात्यांची श्रीमंती शिकवून जायच्या. आता मात्र त्यातली एक आत्या दिसेनाशी झालीय. त्यामुळे त्यांचा थोडा हलका कमी होतो एवढेच. आणि मग आमच्या कुटुंबात सारख्या धावपळीत असायच्या त्या आमच्या काकू.. घरातल्या प्रत्येक काकूने आमच्या घराला वेगळा मनमोहक रंग दिलाय.
सर्वांत मोठी काकू आम्ही तिला ताई म्हणायचो.. आज ती आमच्यात नाही. पण तिची आठवण आली की सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते तिचं स्वच्छ, टापटीप स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातल्या कोणत्याही रांगेत हात घाला कोणतंही भांडं उचला ते आरशासारखं चमकत असायचं ते तिच्यामुळेच.. स्वच्छता हा ताईसाठी नियम नव्हता तो तिचा स्वभाव होता. एरवी तिच्या चेहर्‍यावर कायम एक प्रसन्न हास्य असायचं. मग माझी आई.. आईबद्दल लिहायला बसलो, तर वेगळं पुस्तकच होईल. तिच्या मायेनेच तर या सगळ्या आठवणींना अर्थ मिळालाय. त्यानंतर अलका काकू. आशीसारखचं आजही शेतीशी तिचं नातं तितकंच घट्ट आहे. तात्यांसोबत बागेत नळ्या ओढणं, शेतात काम करणं आणि तात्यांचा मोठा शर्ट घालून तिचं काटेरी वांग्याच्या वावरत शिरणं ,हे दृश्य आजही डोळ्यासमोर उभं राहतं. हात ओरबाडले जायचे, काटे टोचायचे, पण तेवढ्याने तिच्या चेहर्‍यावरचं हास्य मात्र कधी कमी व्हायचं नाही.. कामावर प्रेम करणारी माणसं अशीच असतात बहुतेक.. आणि सर्वांत लहान प्रमिला काकू नावाप्रमाणेच प्रेमळ.. आजवर कुणालाही उलट शब्दाने उत्तर दिलेलं मी तिच्या तोंडून ऐकलेले नाही. ती बोलण्यापेक्षा वागण्यातून माणूस जिंकते. तिच्या प्रत्येक कृतीत आदर तर असतोच पण तिच्या माहेरच्या संस्कारांचा सुगंधही भरभरून जाणवतो. आजच्या काळात मोठेपणा दाखवणारी माणसं भरपूर भेटतात पण स्वतःचं मोठेपण लपवून ठेवणारी माणसं फार कमी उरली आहेत. माझ्या आत्या आणि काकू त्या दुसर्‍या प्रकारातल्या..
त्यांनी कधी कुठलं व्यासपीठ गाजवलं नाही. त्यांच्या नावाचे सत्कार झाले नाहीत. त्यांचे फोटो कुठे वर्तमानपत्रात वैगरे छापून आले नाहीत. पण त्यांनी ज्या पद्धतीने संसार उभे केले नाती जपली घर सांभाळलंमुलांना संस्कार दिले त्यासाठी कोणत्याही वेगळ्या पुरस्काराची गरजच नाही. आज मागे वळून पाहिलं की जाणवतं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे त्याग बहुतेक वेळा शांतपणे जगणार्‍या स्त्रियांनीच केलेले असतात. त्यांनी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवली आणि संसार तुटू दिले नाहीत.. नाते विस्कटू दिले नाहीत. तर स्वतःचे पंख मिटत, इतरांच्या स्वप्नांना पंख दिले. आज त्या सर्वांना मनस्वी नमस्कार करावासा वाटतो. कारण त्यांनी आम्हाला फक्त प्रेम दिलं नाही.. तर कष्टाची किंमत शिकवली.. स्वच्छतेची सवय दिली.. संस्कारांची श्रीमंती दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात त्या भिंतींमध्ये माया ओतणारी माणसं असतात, हे जगण्याचं सर्वांत मोठं तत्त्वज्ञानही त्यांनीच शिकवलं.
आज त्या दिवसांच्या आठवणींना हात लावला की आत्या अजूनही वावरात ढेकळांसोबत दिसते ताई अजूनही पितळेचं भांडं चकाकवत असते अलका काकू काटेरी वांग्याच्या वाफ्यात हसत शिरलेली दिसते आणि प्रमिला काकू नेहमीसारखी शांतपणे सगळ्यांना आपलंसं करत असते.. आणि आई.. ती तर वेगळी कुठे.. तीच तर माझ्या आतमध्ये असते.. जी हे एवढं माझ्याकडून लिहून घेत असते.

Serene shadows that nurture a home and life..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *