नाशिक : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पाणी साचणे आणि स्थानिक स्वरूपाचे नुकसान झाले असले, तरी प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजना, विविध यंत्रणांतील प्रभावी समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार अॅड. राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शनिवार आणि रविवारच्या सुट्यांमध्ये धबधबे, पर्यटनस्थळे आणि नदीकाठ परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Flood situation under control; Ramkund to remain closed for another two days.