वाह रे…जेन-झी, कमालच केली तुम्ही. मागील 12 वर्षांत कुणी नाही करू शकले, अशी अफलातून कामगिरी करून दाखवलीत तुम्ही. सलाम आहे तुम्हाला!!! काल-परवापर्यंत तुम्हाला आम्ही लहान, बालिश, नादान, बेजबाबदार, अल्लड, वात्रट… आणि काय काय नाही त्या विशेषणांनी हिणावत होतो. तुम्ही त्या सर्व गैरसमजुती तुमच्या कृतीतून खोडून काढल्या आहे.
एक सिजेआय तुम्हाला कॉक्रोच, पॅरासाइट काय म्हणतो, तुम्ही त्या विटंबनेचीच विटंबना करत कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक इन्स्टाग्राम अकाउंट निर्माण करून काही आठवड्यांतच सव्वादोन कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स बनवले. जगातील कुठल्याही राजकीय पक्षाला जे करता आले नाही, अशी अभुतपूर्व फॉलोविंग तुम्ही निर्माण केली. अल्लड मुलांचे अल्लड चाळे समजून सुरुवातीला त्याची थट्टा करत, दुर्लक्षही केले गेले. कावळा बसायला आणि फांदी मोडायला जसा योगायोग होतो, तसाच सीजेपी स्थापन होण्याचा आणि नीट पेपर लीक होण्याचा योगायोग झाला आणि क्रांतीची ठिणगी पेटली. त्यानंतरच्या महिनाभरातील घडामोडी अक्षरशः एखाद्या क्रांतीप्रमाणेच घडत गेल्या आणि काल त्याच धर्मांध सरकारला आषाढी एकादशीच्या दिवशी सुबुद्धी देऊन, जेन-झीच्या आक्रोशासमोर गुडघे टेकवून, एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला.
मागील 12 वर्षांत बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. त्यापूर्वीच्या सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळून नवीन सरकार सत्तेत आले. ‘अच्छे दिन आएंगे’ या भाबड्या अपेक्षेने भारतीय जनतेने आपल्या लाडक्या पक्षाला सत्तेत बसवले. पाहिले 5 वर्षे आनंदात गेले, दुसरेही 5 वर्षे काही अपेक्षेत तर काहीसे हतबलतेत गेले. आता निवडून तर दिलेच आहे, घडणार्या घटनांना बघत बसण्याशिवाय दुसरं काय करू शकतो, या भावनेने जनता बघ्याची भूमिका घेत राहिली. बघता बघता तिसर्या पंचवार्षिक निवडणुकीत तर जनतेच्या हाती काही उरलेच नव्हते. सगळे काही मॅनेज झालेले होते. इच्छा असूनदेखील कुणी काही बोलू शकत नव्हते, किंबहुना बोलण्याचे धाडसही होत नव्हते. उघड्या डोळ्यांनी राजकीय कोलांटउड्या बघण्याशिवाय पर्याय नव्हता. राजरोजपणे चाललेला भ्रष्टयाचार, विकत घेतलेली सरकारी यंत्रणा, संशयास्पद वागणारे, कृती करणारे लोकशाहीचे तिसरे आणि चौथे स्तंभ म्हणून मिरवणार्या न्यायव्यवस्था आणि मीडिया यांची मनमानी जनमानसात संशयाचे, नैराश्याचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करत होते. एखाद्या पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीप्रमाणे कित्येक गैरप्रकार हतबल होऊन बघत बसण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. अशा परिस्थितीत जेन-झीने जे करून दाखवले, त्यासाठी पुन्हा पुन्हा सलाम करावासा वाटतो.
सुरुवातीला मलाही सीजेपी एक षडयंत्र असल्याचे जाणवले. कारण, एक मराठी माणूस अमेरिकेतून भारतात काय येतो, लोकप्रिय काय होतो, ठिकठिकाणी आंदोलने काय करतो, लोकांना उकसवून सरकारचा विरोध काय करतो आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही, याउलट त्याला प्रदर्शने आणि आंदोलने करण्यास परवानगीसुद्धा मिळते, हे मला थोडे आश्चर्यकारक वाटले. यापूर्वी असे काही करणार्याला देशद्रोही, धर्मविरोधी, अर्बन नक्षल, आतंकवादी अशी लेबल लावून त्याच्या मागे ईडी, सीबीआय, आयटी, पोलीस यंत्रणा लावून आणि खूपच डोईजड झालाच तर त्याला गायब पण केले जात होते. हा मात्र मोकळा फिरत होता, जणू सरकारची बी टीम असल्यागत. महत्त्वाच्या विषयापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे खेळणे सरकारकडून दिले जातात, याचे कित्येक घटनांची उदाहरणं देता येतील, असेच काहीसे हे खेळणे आहे, असा माझा सुरुवातीचा समज होता. जेव्हा देशातील एक वरिष्ठ, जबाबदार आणि प्रख्यात आंदोलक या चळवळीत सामील झाले, तेव्हा मला यात काहीतरी दम असल्याचे जाणवले. याच वेळी नेमकं ‘नीट’चा पेपर लीक झाल्याची घटना घडते आणि दुग्धशर्करा योग म्हणा किंवा कावळा बसण्याचा आणि फांदी मोडण्याचा योग म्हणा, परंतु तसा योग घडून आला.
नीट पेपरफुटीसारख्या घटनेने देशभरात वीस मुलांचा जीव घेतला. याच घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीत जंतर-मंतरवर उपोषण करून आंदोलनास सुरुवात झाली. 12 दिवस झाले, 15 दिवस झाले, 18 दिवस झाले, काहीच घडत नव्हते. सरकारकडून कुठलीच दखल नाही, चर्चा तर सोडाच साधा संपर्कदेखील नाही. उपोषणकर्ता मरणार असे वाटू लागले. हळूहळू सोशल मीडियावर याबद्दल सहानुभूती वाढू लागली, लोक त्याची दखल घ्यायला लागले, तसतसे सरकारवरील दबाव वाढत गेला. अचानक एके दिवशी पोलिसांनी हस्तक्षेप करत उपोषणकर्त्याची उचलबांगडी करत बळजबरीने इस्पितळात दाखल केले. जसे यापूर्वीचे अनेक आंदोलनं अक्षरशः चिरडली गेली, तशीच अवस्था याही आंदोलनाची होणार, असेच चित्र दिसत होते. ये हमारी सरकार है, यहा कोई इस्तीफा नहीं देता भाई. पहले होता था, अब नहीं, असे देशाचे मंत्रिगण भर पत्रकार परिषदेत मी ऐकले आहे, त्यामुळे हे आंदोलन कुणा मंत्र्याचा राजीनामा घेणार, याबद्दल माझ्या मनात शंकाच होती.
शेवटी ती जेन-झीच ना. मानेल ती जेन-झी कसली?
स्वतःच्याच मनाप्रमाणे करायचे, आपल्या आवडी-निवडी, इच्छा-अनिच्छा, मतमतांतर आणि आपले हावभाव, परखडपणे, कुठल्याही दबावाला न जुमानता, भावनांना अधिक भाव न देता, निडरपणे आणि स्पष्टपणे व्यक्त करून जे हवं तेच करणारे हेच खरे जेन-झी. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, हो-नाही याचा फार विचार न करता, माझ्यासाठी जे योग्य आहे, जे चांगले आहे आणि माझ्या दृष्टीने जे बरोबर वाटते, तेच मी करणारी मुलं… अशी ती जेन-झी. काल-परवापर्यंत ते आई-वडिलांवर अवलंबून होते म्हणून काही बोलत नव्हते किंवा व्यक्त होत नव्हते. परंतु, जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा कुणालाही न जुमानता, कसली तमा न बाळगता, निडर होऊन रस्त्यावर उतरली. मुंबईत तर एक रणरागिणीने कमालच केली. एकट्या मर्दानीने, एका हाताने पोलीस व्हॅन अडवून धरली. पोलीस त्यांचे काम करतेय, मी माझे काम करतीये. त्यांना जे करायला हवं ते करत नाही, म्हणून मी माझ्या सहकार्यांना घेऊन जाणार्या गाडीला अडवून त्यांची सुटका करत आहे, अशी डरकाळी त्या वाघिणीने फोडली. दम लगता है बॉस…! तेही मुंबई पोलिसांना, बाप रे!!!
शेवटी राजीनामा द्यावाच लागला. कुणी काहीही म्हणो, हे एक अभूतपूर्व यश आहे, या जेन-झी आंदोलांचं, हे मान्यच करावं लागेल! पुढे काय काय घडामोडी होतील, माहीत नाही, तूर्तास तरी अशी परिस्थिती आहे. न झुकणारं, न वाकणारं, न जुमाणणारं सरकार झुकलं आणि वाकलं. हुशार असतील तर, असंच झुकून, वाकून राहावं, कारण आता जेन-झी जागी झालीये, केवळ जागीच नाही तर रस्त्यावर उतरली आहे. सत्तेत बसलेत ना, तर अधिकाराने नाही तर जबाबदारीने वागा, असा इशाराच दिला आहे जणू. तुम्ही कितीही अन्याय, अत्याचार करा, आम्ही आता मागे हटणार नाही. बघा ना, इतक्या लहान लहान मुलांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला गेला, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या, बॅरेकेटला करंट सोडला, खिळे लावलेल्या लाठ्यांनी झोडलेत ओ ती मुलं! आपण आपल्या मुलांना अशी वागणूक देऊ का बरं? अहो, हल्ली शाळेतल्या शिक्षकांनादेखील मुलांना शारीरिक शिक्षा करण्यास मनाई आहे, तो कायद्यानेही गुन्हा आहे, असे असताना मुलांना रस्त्यावर मारणे, वाईटच! आता या मारहाणीला कोण जबाबदार आहे, हाही प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे! त्याचीही जबाबदारी संबंधित मंत्री, प्रधानमंत्री किंवा स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नसावे.
या आंदोलनातून काय शिकावे? सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. जिने सत्तेवर बसवले, तीच पतनाचे निमित्त होऊ शकते, म्हणून जपून वापर करा. अहंकार अयोग्यच, मग तो सत्तेचा असो की पैशांचा, की अधिकारांचा! खुर्ची सोबत अधिकार नाही, तर जबाबदारी येते. जबाबदारीने वागावे, अन्यथा आपलंच पोर आपला बाप बनून आपल्याला ठिकाणावर आणेल. ज्या जनतेने खुर्ची दिली, किंबहुना ज्या जनतेमुळे खुर्ची मिळाली आहे, तिला कमी लेखू नका. ती जशी बसवू शकते, तशी उतरूही शकते. सर्वच गोष्टी आणि सगळीच माणसं पैशाने मॅनेज करू नये. अशाने चुकीचा पायंडा पडतो आणि पुढील पिढी यालाच योग्य मानून चुकीच्या मानसिकतेतून भरकटायला लागतो. अशा खूप काही शिकवणी आहेत या आंदोलनातून. सरतेशेवटी एक सांगावंसं वाटतं, जेन-झीने ही वेळ आणली आहे, जेन- अल्फा तो अभी बाकी है. 2029 पर्यंत जेन-अल्फा मतदार होतील, याचे भान असू द्यावे, सत्ताधार्यांनो!
Wow… Gen Z!