विश्वास संपादन करून दागिन्यांचा डबा घेऊन आरोपी पसार
सिन्नर : प्रतिनिधी
सिमेंटच्या गाडीचे पैसे देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने 58 वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करत दीड लाख रुपये किमतीचे 5 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना सिन्नर शहरात घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, सध्याच्या बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत 5 लाखांच्या पुढे आहे.
सिन्नर – घोटी रोडवरील हुसेनबाबानगर (मामाश्री हॉटेलशेजारी) येथे राहणार्या शोभा पोपट लोणारे (58) या शनिवारी (दि.25) दुपारी घरी
एकट्याच होत्या.
त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्या घरी आला. “तुमच्या मुलाने रोशनने सिमेंटच्या गाडीचे पैसे देण्यास सांगितले आहे,” असे सांगत त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला सोन्याचे दागिने स्टीलच्या डब्यात ठेवण्यास सांगितले. महिलेने तसे करताच आरोपीने संधी साधून दागिन्यांचा डबा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत सुमारे पाच तोळे वजनाचे, 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. त्यामध्ये पोहे हार, शॉर्ट पोत, तीन अंगठ्या, कानातील दागिने तसेच नथ यांचा समावेश आहे.
या प्रकरणी शोभा लोणारे यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.
सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
अनोळखी व्यक्ती कोणतेही कारण सांगून घरात आल्यास किंवा पैसे, दागिने अथवा मौल्यवान वस्तूंबाबत माहिती विचारल्यास त्यांच्यावर त्वरित विश्वास ठेवू नये. संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Elderly woman’s five tolas of gold stolen in Sinnar