परिसरात भीतीचे वातावरण
खामखेडा : वार्ताहर
खामखेडा येथील पाट कॅनॉल शिवारात एकाच दिवशी तिघा शेतकर्यांना सर्पदंश झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात शेतातील गवत वाढल्याने आणि साचलेल्या पाण्यामुळे साप बिळातून बाहेर पडत असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढत आहेत.
शेतकरी महिला कविता ज्ञानेश्वर मोरे, आठवीची विद्यार्थिनी उर्मिला केदा आहेर आणि शेतमजूर प्रवीण मोरे यांना शेतात काम करताना सर्पदंश झाला.
तिघांनाही तातडीने कळवण ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्मिला आहेर हिला विषारी सर्पदंश झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. चार दिवसांच्या उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले असून, तिघांचीही प्रकृती स्थिर आहे.
या तिन्ही घटना खामखेडा शिवारातील डोंगरालगतच्या पाट कॅनॉल परिसरात अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरात घडल्याने त्या भागात सापांचे प्रमाण वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेतात काम करताना अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात
येत आहे.
Three farmers bitten by snakes on the same day in Khamkheda