प्राधिकरण लवकरच महत्त्वपूर्ण बैठक घेणार
नाशिक : प्रतिनिधी
कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणातर्फे गर्दीचे व्यवस्थापन करण्यावर विशेष भर दिला जात आहे. याअंतर्गत गर्दी व्यवस्थापनसाठी शेजारील जिल्ह्याशी समन्वय साधला जाणार असून, यासंदर्भात लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात विविध विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु, यासोबतच गर्दीचे व्यवस्थापन करण्यावरही जिल्हा प्रशासन व कुंभमेळा प्राधिकरणाने विशेष नियोजन सुरू केले आहे. देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांची गर्दी पाहता आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाविकांना आहे तिथेच थांबवता येऊ शकते का, आणि शहरातील गर्दी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना शहरात कसे आणता येईल, या दृष्टीने कुंभमेळा प्राधिकरण चाचपणी करीत आहे. यासंदर्भात लवकरच शेजारील नऊ ते दहा जिल्ह्यांतील आपत्ती विभाग अधिकारी आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्यात महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
नोव्हेंबरपासून साधुग्रामच्या कामास प्रारंभ
नाशिकमधील साधुग्रामच्या कामास नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. साधरणतः जून-जुलै महिन्यात आखाडे येण्यास सुरुवात होते. तोपर्यंत साधुग्रामचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सिंह यांनी यावेळी दिली. याशिवाय, त्र्यंबक साधुग्रामची नियोजित जागा बदलण्याचा विचार सुरू असल्याचे सांगताना त्यांनी साधुग्राम घाटाजवळ आणि चारही बाजूंनी येण्यासाठी व जाण्यासाठी सोयीस्कर ठरेल अशा ठिकाणी होईल, असेदेखील सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
..तर कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
जिल्ह्यात सध्या सुरू असलेली विकासकामे पावसामुळे काहीशी कमी-अधिक प्रमाणात होत आहेत. रस्त्यांच्या कामांसोबतच 10 ते 12 प्रकारच्या युटिलिटी एकाचवेळी टाकण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी कामाचा वेग कमी आहे, तेथे कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.
Fresh planning for crowd management at the Kumbh Mela.