डुबेरेवाडी, कासारवाडीतील दोन गुन्ह्यांची उकल; तिघांना अटक
सिन्नर : प्रतिनिधी
डुबेरेवाडी आणि कासारवाडी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणार्या टोळीला सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या कारवाईत तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि तीन मोबाइल असा एकूण 2 लाख 48 हजार 95 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रवींद्र प्रभाकर धोक्रट (27, रा. सोमठाणे), किरण मनोज पटेल (27, रा. ब्राह्मणवाडे, ता. निफाड) आणि सागर रवींद्र कदम (27, रा. कदम मळा, सोमठाणे) यांना अटक करण्यात आली आहे.
सिन्नर व वावी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी डुबेरेवाडी आणि कासारवाडी येथे प्रत्येकी एक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली. कासारवाडी येथील महिलेच्या गळ्यातून दागिने ओरबाडून काढली. यामुळे तिच्या कानालाही जखम झाली होती.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे डोरले, कानातील दागिने, एमएच-15 केआर-3269 क्रमांकाची मोटारसायकल तसेच तीन मोबाइल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 48 हजार 95 रुपये इतकी आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी रवींद्र धोक्रट याच्याविरुद्ध सिन्नर एमआयडीसी, सिन्नर, कोपरगाव तालुका आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांत चोरी, मारामारी तसेच दरोड्याच्या तयारीचे पाच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाढवे तसेच नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे आणि आप्पासाहेब काकड यांनी सहभाग घेतला.
Chain snatching gang in Gajaad