खड्ड्यांप्रश्नी ठाकरे सेनेचा आज ठिय्या

सत्ताधार्‍यांची दुटप्पी भूमिका; विशेष महासभा न घेण्याचे कारण काय?

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील खड्डेप्रश्नावरून ठाकरेंची सेना कमालीची आक्रमक झाली आहे. महापौरांनी खड्ड्यांप्रश्नी विशेष महासभा बोलवावी, याकरिता तसेच निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी आज गुरुवारी (दि.30) महापालिकेत सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांचा बळी जाऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलन छेडले जात असल्याचे पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांनी सांगितले.
गटनेते पोरजे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, शहरातील खड्ड्यांमुळे विविध घटनांत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. दरम्यान, शहरात पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी 17 जुलैच्या महासभेत शहरातील खड्ड्यांबाबत विशेष महासभा घेतली जाणार असल्याचे सभागृहात सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीही विशेष महासभा घेण्यात आलेली नाही. शिवसेना शिंदे गटाने विशेष महासभेची मागणी केली असली तरी शिंदे गट सत्तेत असल्याने त्यांचे तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो, अशी अवस्था या दोन्ही पक्षांची असल्याची टीका पोरजे यांनी केली. मात्र, नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे शिवसेनेचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रशासन, भाजपा व शिंदे गट विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत आज गुरुवारी नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे आंदोलन छेडले जात असल्याचे पोरजे यांनी म्हटले आहे.

विशेष महासभा घेऊ नये, अशी भूमिका महापौरांची दिसते आहे. शहरातील रस्त्यांची स्थिती भयावह झाली असून, दररोज अपघात होत आहेत आणि यात अनेकजण गंभीर जखमी होत आहेत. प्रशासन व सत्ताधार्‍यांना याचे काहीच पडलेले नाही. खड्ड्यांप्रश्नी विशेष महासभा घ्यावी, याकरिता मागील काही दिवसांपासून मागणी करत आहोत. मात्र, सत्तेच्या जोरावर याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. परंतु, शिवसेना हे कदापि सहन करणार नाही. नागरिकांसाठी आज पालिकेच्या पायर्‍यांवर आंदोलन करत असून, लवकरच मोठे आंदोलन छेडले जाणार आहे.
– केशव पोरजे, गटनेते, ठाकरे सेना

Thackeray Sena’s stand today on pothole issue

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *