मातीच्या मैदानावर सुरू झालेली धाव ग्लास्गोत

पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये दिलीप गावितची सुवर्णकामगिरी

सुरगाणा : प्रतिनिधी
डोंगर-दर्‍यांनी वेढलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या दुर्गम आदिवासी गावातील जिद्दी खेळाडू दिलीप महादू गावित याने जागतिक क्रीडापटावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. स्कॉटलँडमधील ग्लास्गो येथे झालेल्या 2026 च्या राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर टी-47 प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावले
लहानपणीच उजवा हात गमावल्यानंतरही खचून न जाता दिलीपने जिद्दीच्या जोरावर हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सन 2009 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोरणडोंगरी येथून त्याच्या शिक्षणाला आणि क्रीडा प्रवासाला सुरुवात झाली. साधी शाळा आणि मातीच्या मैदानावर सराव करत तत्कालीन मुख्याध्यापक भास्कर भुसारे, शिक्षक केशव महाले, मधुकर राऊत, गणेश पाडवी, यशवंत भोये आणि लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यातील क्रीडागुण विकसित झाले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये दिलीपने 2013-14 (चौथी) आणि 2015-16 (सातवी) मध्ये धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली होती. केंद्र ते जिल्हा स्तरावरील या यशाने त्याला जागतिक स्वप्ने पाहण्याचे बळ दिले.
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आणि अपंगत्वावर मात करणार्‍या आदिवासी तरुणाचा हा प्रवास ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तोरणडोंगरी ग्रामस्थ, सरपंच, पेसा समितीचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचा गौरव करत आनंद व्यक्त केला आहे.

‘मोठी स्वप्ने पाहा अन् मेहनत करा‘
जागतिक स्तरावर यश मिळवल्यानंतरही दिलीपने आपल्या मातीशी नाळ जपली आहे. गावात आल्यावर तो शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना “मोठी स्वप्ने पाहा आणि मेहनत करा“ असा संदेश देतो. त्याला विद्यमान मुख्याध्यापक दिगंबर चौधरी यांच्यासह पंडित गायवन, मनोहर भोये, रामदास भोये, पुंडलिक चौधरी, श्रीकांत गवळी, मधुकर राऊत व गणेश पाडवी यांचे प्रोत्साहन लाभले.

The run that began on a clay track—in Glasgow.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *