पिकांना जीवदान, टोमॅटोवर फवारणी खर्चात वाढ
लासलगाव : वार्ताहर
परिसरात गुरुवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली, तसेच शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला. दिवसभर सूर्यदर्शन झाले नसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
या पावसामुळे सोयाबीन, मका यासह अन्य खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, ही पिके जोमाने वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, दुसरीकडे या पावसामुळे टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना टोमॅटो पिकावर मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी करावी लागत असून, परिणामी शेतीचा खर्च वाढला आहे. पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी सकाळपासून रस्त्यांवर वर्दळ संथगतीने सुरू होती, तसेच बाजारपेठेतदेखील या पावसामुळे शुकशूकाट दिसून आला, शेतकर्यांची औषध खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी दिसून आली.
सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने नद्यांना पूर येत आहे. मात्र लासलगावच्या शिवनदीला अद्याप पाहिजे. त्याप्रमाणात पुराचे पाणी आलेले नाही. नदी कोरडी असल्याने परिसरातील सांडपाण्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Heavy rain in Lasalgaon and the surrounding area.