पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. सरासरीच्या 139.3% म्हणजेच 347.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नाशिक शहरात एकाच दिवसात 132 मिमी पाऊस पडला तर त्र्यंबकेश्वरमध्ये 194 मिमी नोंदवला गेला, ज्यामुळे गोदावरी नदीला पूर आला.
एकदा नाही, चक्क दोन-दोनदा पूर आला, तेही सलग दोन दिवस. आहे की नाही कमाल या पावसाची. परिणामी, नाशिकच्या रस्त्यांची पुरती वाट लागून गेलीये. एक रस्ता दाखवा मला ज्यावर खड्डे नाही, पाणी साचलेले नाही, ज्यावर ट्रॅफिक होत नाहीये, ज्यावर अपघात झालेले नाहीत. शोधून दाखवलात तर माझ्याकडून बक्षिसास पत्र व्हाल. काय मग घेताय ना… चॅलेंज? चला, लागा कामाला!
खरं सांगू का? या पावसालाही आत्ताच पडायचं होतं, म्हणजे मुद्दाम पडलाय तो. त्याला जून महिन्यात पडायला काय जीव गेला, मेल्याला? सगळा एकदाच पडला, जुलै महिन्यातच. गेल्या वर्षी कसा शहाण्यासारखा मे महिन्यापासूनच पडायला सुरुवात केली. तेव्हा तर 4 -5 महिने पावसाळा सुरू होता, पण रस्त्यांची इतकी दुर्दशा नाही केली बिचार्‍याने. अगदी एखाद्या गोड, गोंडस, शहाण्या आणि सालस बाळाप्रमाणे वागलास. याच वर्षी तुला अशी औदास कशी सुचली. जेव्हा मनपा बेवारस होती, तेव्हा बरं नाही पडलास? आम्ही आलो म्हणून याच वर्षी मुद्दाम जोराने कोसळलास ना तू, किती वाईट आहेस रे तू? हे योग्य नाही हं पावसा भाऊ! आमची गोची करण्यासाठीच आला आहेस… असं मी नाही, सत्तेत बसलेले म्हणत असावे, असा माझा अंदाज आणि तर्क आहे. असे असेलच का? माहीत नाही, खात्री तर अजिबात नाही.
बघा ना, फक्त नाशिकच नाही, तर उभ्या महाराष्ट्रात किती तांडव घातलाय या पावसाने. कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमातून, सात सात हजार कोटी रुपये खर्च करून, एवढंच काय तर अगदी थाटामाटात उद्घाटन करून, भलेही ते करताना लाखो लोकांना ट्रॅफिक जॅम करून घाटात वेठीस धरावे लागले होते, अशा नाना प्रकारच्या कष्ट आणि मेहनतीने उभारलेल्या मिसिंग लिंकला भगदाडं पाडलीत या पावसानं. काय म्हणावं आता याला! तरी, सुदैवाने आपल्या राज्यकर्त्यांना शहाणपण सुचले होते म्हणून बरं. फायनल थर दिलेलाच नव्हता, ब्रिज आणि टनेलची टेस्टिंगच चालू होती फक्त. तो पूल आणि तो बोगदा ते मेल्यानंतर किती वर्षे (सॉरी किती युगे) टिकणार याची टेस्टिंग सुरू असल्याने त्यांनी पावसालाही त्यात काढलं, असंच तुम्हालाही वाटलं ना? मलाही तेच म्हणायचं आहे. खरं तर, बात खूप वेगळी आहे. कसं आहे ना… नाशिक असो की महाराष्ट्र, अगदी भारताबद्दलही हेच कारस्थान शिजतंय. हो.. हो.. हे कारस्थानच आहे. तुम्हाला नाही समजणार. तरीसुद्धा समजावण्याचा प्रयत्न करतोय… बघा
समजतंय का? जसे या देशाविरुद्ध चालू आहे, तसेच आपल्या राज्याविरुद्ध आणि नाशिकविरुद्ध एक खूप मोठ्ठं कट कारस्थान शिजतेय. हा पाऊस त्याच कटाचा भाग आहे. म्हणजे कसं बघा, गेल्या वर्षी मनपात कुणाचीच सत्ता नव्हती, तेव्हा इतका पाऊस पडला का नाशिकमध्ये? नाही ना? सरकारने नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासारख्या आपल्या धार्मिक उत्सवाच्या तोंडावर कसा बरं पाऊस पडावा? हे मुद्दाम केले जातेय. हा पाऊस देशद्रोही आहे, धर्मविरोधी आहे, शहरातच पडतोय ना तर तो अर्जन नक्षल तर आहेतच, सोबत तो मनपात आणि राज्यात सत्तेत बसले आहे, त्यांना खाली खेचण्यासाठीच कोसळतोय. तुम्हाला माहीतच आहे, हे मान्सून वारे देशात निर्माण होत नाही, ते देशाबाहेरून येतात, तेही पश्चिम दिशेकडून. म्हणजे हेही सिद्ध होते की यात परकीय आणि खास करून पाश्चिमात्य देशांची मिलीभगत आहे. तिकडून येताय म्हणजे येण्या-जाण्यासाठी फंडिंगसुद्धा तिकडूनच होत असणार, हा तर्क लावण्यास खूप हुशार असण्याची आवश्यकता नाही ना? सिंहस्थ कुंभमेळा हाणून पाडण्याचा डाव आहे या पावसाचा. मेळ्यापर्यंत रस्ते होऊ द्यायचे नाही, सुखसुविधांची सुरू असलेली कामं पूर्ण होऊ द्यायची नाही, स्थानिक लोकांना त्रास देऊन शेवटी त्यांनीच या मेळ्याच्या त्रासाला कंटाळून मेळाच रद्द करावा, अशी या पावसाची सुप्त इच्छा आहे. रस्त्यावर अपघात होऊन काही लोक दगावले तर त्याला अपशकुन मानून या मेळ्याला लोकांनी स्वतःहून विरोध करावा, म्हणून हा पाऊस निष्पाप लोकांच्या जीवावर उठला आहे. आता आणखी काही दिवसांनी रोगराई पसरली तर वावगे वाटून घेऊ नका, हे पावसाचेच कटकारस्थान असणार आहे. या कटकरस्थानाला बळी पडू नका. ढगफुटी ढगफुटी होणार असे संकेत देऊन, अचानक पावसाने गायब होऊन तोंडघशी पाडणारा हा पाऊस म्हणजे आपल्या देशाला, राज्याला आणि अंततः नाशिकला बदनाम करण्याचाच प्रयत्न करत आहे, लक्षात घ्या. काय दुर्दशा केलीये माझ्या नाशिकची. मी याला विकास समजलो, तरीसुद्धा कामं करण्याची पद्धत असते, कामाची वेळ असते, नियोजन असते आणि सर्वांत महत्त्वाचं… कामाला दर्जा असावा.

Oh rain, rain… you too!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *