राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
नाशिक : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकुराबद्दल हिंदू समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून धार्मिक व जातीय विद्वेषासंदर्भातील लागू होणारी कठोर कलमे लावावीत, संबंधित पोलीस अधिकार्यांवर कारवाई करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला. यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
पत्रकार परिषदेला सकल हिंदू समाजाचे धवलसिंह (दादा) मोहिते-पाटील, दीपक काटे, प्रकाश बेलवाडे, बाबा घोरपडे आणि व्यंकटेश मोरे उपस्थित होते.
यावेळी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटमधील कथित मजकुरामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. हे प्रकरण केवळ एका मुलीविरोधातील गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, विशिष्ट समाजातील महिलांना लक्ष्य करण्याची विकृत मानसिकता आणि धार्मिक-जातीय विद्वेषाचे स्वरूप दर्शवणारे असल्याचा आरोप करण्यात आला.
आरोपींचा उद्देश एका मुलीचे लैंगिक शोषण करण्यापुरता नसून, विशिष्ट समाजातील महिलांना जाळ्यात ओढणे, त्यांचा अवमान करणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा असल्याचा दावा करण्यात आला. प्रेमसंबंधाच्या माध्यमातून मुलीला जाळ्यात ओढणे, अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करणे, अत्याचार करणे तसेच धर्मांतर व विवाहासाठी दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला.
यावेळी पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये विशिष्ट समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी असतानाही धार्मिक व जातीय विद्वेषासंदर्भातील लागू होणारी कठोर कलमे का लावण्यात आली नाहीत, असा सवाल करण्यात आला. आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, दहशतवादविरोधी पथक किंवा सीआयडीमार्फत संभाव्य नेटवर्कची चौकशी करावी, खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करून फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घ्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
..तर समाजात असंतोष वाढेल
त्यांचे एक वादग्रस्त विधान हे केवळ एका मुलीविरोधात नसून, संपूर्ण समाजाला दिलेला इशारा असल्याचा आमचा आरोप आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली नाही तर समाजात असंतोष वाढेल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. – व्यंकटेश मोरे
‘Sakal Hindu Samaj’ takes an aggressive stance over WhatsApp chat issue.