पुलांच्या दुरुस्तीची खासदार वाजेंकडे मागणी
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
भगूर-पांढुर्ली मार्गावरील दारणा नदीवरील पूल तसेच भगूर-घोटी (शेणीत) मार्गावरील जीर्ण पुलाची तातडीने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी देवळाली कॅम्प येथील सामाजिक कार्यकर्ते रतन राजदास चावला यांनी नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता तसेच जिल्हाधिकारी, नाशिक यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दोन्ही पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे, तुटलेला रस्ता आणि पाणी साचत असल्याने वाहनचालक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
भगूर-पांढुर्ली आणि भगूर-घोटी मार्ग हे नाशिक ग्रामीण, सिन्नर आणि इगतपुरी या तीन तालुक्यांना जोडणारे महत्त्वाचे मार्ग असल्याने या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. पुलांची सद्यस्थिती पाहता कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनासोबत पुलांच्या दुरवस्थेची छायाचित्रे ही जोडण्यात आली असून, संबंधित पुलांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी, धोकादायक भागांची त्वरित दुरुस्ती, आवश्यक असल्यास नवीन पूल किंवा मजबुतीकरणाच्या कामास प्रशासकीय मंजुरी तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
Bridge on the Bhagur-Pandhurli route has become dangerous.