गणेशोत्सव हा तसा मुंबई, ठाण्यासह कोकणात उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव. गेल्या काही वर्षांत मात्र तो राज्याच्या अन्य भागांसह देशात आणि विदेशात ज्या ज्या ठिकाणी मराठी बांधव राहतात तिथे जल्लोषात साजरा होऊ लागला आहे. गणेशोत्सवाला जसे व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले तशा काही चुकीच्या गोष्टींनीही या उत्सवात शिरकाव केला. श्रीगणेशाचे रूप कसे आहे याचे यथोचित वर्णन श्री गणपती अथर्वशीर्षात आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बसवण्यात येणार्या गणेशमूर्तीही तशाच असायला हव्यात; मात्र प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही. हल्ली बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीपेक्षा सजावटीला अधिक प्राधान्य दिले जात असल्याने त्यानुरूप विविध वेशभूषेतील मूर्ती आणल्या जातात. मुंबईतील काही मंडळांत भव्य गणेशमूर्ती हेच गणेशभक्तांंचे आकर्षण केंद्र असल्याने काहीतरी वेगळे करायचे म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात आणि अन्य देवतांच्या, अवतारांच्या वेशभूषेत गणेशमूर्ती साकारल्या जातात.
गणेशमूर्ती बनवणार्या कारखान्यांमध्ये फेरफटका मारला असता यंदाही अनेक गणेशोत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, भगवान श्री शंकर, श्रीविष्णू, स्वामी समर्थ, साईबाबा आदींच्या वेशभूषेत गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी ऑर्डर्स दिल्या आहेत. सर्व देवता आणि अवतार हे भक्तांंचे कल्याण आणि दुष्ट प्रवृत्तीचा संहार करणार्याच असल्या तरी प्रत्येक देवतेचे कार्य वेगवेगळे आहे, तसे त्यांचे उत्सवही वेगवेगळे आहेत. कृष्णजन्माष्टमीला आपण श्रीगणेशाची मूर्ती घरी आणत नाही किंवा श्री रामनवमीला श्रीगणेशाची शोभायात्रा काढत नाही. मग श्रीगणेश चतुर्थीच्या वेळी गणेशाला विविध वेषभूषांत का दाखवतो? हिंदू धर्मातील प्रत्येक देवतेला विशिष्ट आकार आणि विशिष्ट वेशभूषा आहेत. त्यातून सिद्ध होणार्या प्रतिमेतून अथवा मूर्तीतून त्या त्या देवतेचे तत्त्व आणि चैतन्य प्रक्षेपित होते, असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे मूर्तीला श्रीरामाच्या मूर्तीचा आकार दिला आणि शीर केवळ श्रीगणेशाचे लावले की, ती मूर्ती शत-प्रतिशत श्रीगणेशाची
होत नाही.
कारण शरीराचे अन्य अवयव आणि वेशभूषा ही श्रीरामाचीच असणार आहे. त्यामुळे श्रीगणेशमूर्तीवर असे प्रयोग करणे योग्य नाही. स्वामी समर्थांचे काही भक्त घरी स्वामींच्या वेशभूषेतील गणपती आणतात. साईबाबांचे भक्त साईबाबांच्या वेशभूषेतील गणेशमूर्ती बनवून घेतात तर छत्रपती शिवरायांचे कट्टर शिवभक्त चक्क छत्रपती शिवरायांच्या वेशातील गणेशमूर्ती ऑर्डर करून बनवून घेतात. अशा प्रकारच्या गणेशमूर्ती गणेश चतुर्थीच्या दिनी घरी आणणार्याचा त्या त्या संतांविषयी आणि महापुरुषांविषयी श्रद्धेचा भाग असला तरी अशा प्रकारे आपल्या प्रतिमेला विघ्नहर्त्या श्रीगणेशाच्या स्वरूपात दाखवणे स्वामींना किंवा छत्रपती शिवरायांना कधीतरी आवडले असते का, याचा विचार ही मंडळी का करत
नाहीत.
घरातील बच्चेकंपनीवर कार्टून विश्वातील पात्र, सुपरमॅन, बॅटमॅन यांसारख्या व्यक्तिरेखा यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी या पात्रांच्या रूपात गणेशमूर्ती साकारण्याच्या ऑर्डर्स पालकांकडून दिल्या जातात. अशा काल्पनिक पात्रांच्या वेशात श्रीगणेशाला साकारणे हा श्रीगणेशाचा अवमान नव्हे का? गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी आणल्या जाणार्या गणेशमूर्तीच्या माध्यमातून साक्षात श्रीगणेशच आपल्या घरी अवतरणार आहेत. जोपर्यंत ते आपल्या घरी विराजमान आहेत तोपर्यंत त्यांची आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे, हा भाव 24 तास जागृत राहण्यासाठी श्रीगणेशमूर्तीही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे चौरंगावर किंवा आसनावर विराजमान असलेली हवी.
वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या स्वरूपातील श्रीगणेशाला दहा दिवस पूजून अनंत चतुर्दशीला या पूजलेल्या मूर्तीचे जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा हे विसर्जन नेमके श्रीगणेशाच्या मूर्तीचे होते की अन्य देवता, संत आणि महापुरुष यांच्या मूर्तींचे? याचा विचार अशा मूर्ती घरी आणणार्यांनी करायला हवा. काही मंडळांमध्ये किंवा घरच्या सजावटींमध्ये श्री गणेशमूर्तीला चलचित्राच्या स्वरूपात दाखवले जाते, काही ठिकाणी पेटीत पैसे टाकल्यावर श्रीगणेशमूर्ती उभी राहून पैसे टाकणार्याला लाडूचा प्रसाद देतानाचे प्रयोजन केलेले असते. विविध धातूंच्या भांड्यांपासून, फळांपासून, सुक्यामेव्यापासून, चॉकलेटपासून गणेशमूर्ती बनवल्या जातात. हासुद्धा श्रीगणेशाचा अवमानच आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान काही कंपन्या व्यावसायिक हेतूने श्रीगणेशाचा वापर आपल्या जाहिरातींमध्ये करतात. अशांवर गणेशाची कृपा होईल का? आपल्याला पुरेसे धर्मशास्त्र ज्ञात नसल्याने धार्मिक सणांच्या आणि उत्सवांच्या बाबतीत ’मला सर्व कळते’ या विचाराने आपण हवे तसे वागतो, हवे तसे करतो. धार्मिक सण शास्त्रीयदृष्ट्या कसे साजरे करावेत, याबाबतचे सविस्तर लिखाण आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन धर्मग्रंथांत हजारो वर्षांपूर्वीच मांडून ठेवले आहे. ते तसे साजरे केल्याने मनुष्याला उचित लाभ होतो आणि आनंदही मिळतो. याउलट आपण आपल्याच मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न केल्यास लाभ तर होणार नाही, उलट हानीच होण्याचा अधिक संभव असतो.
Installing Ganesh idols in unconventional attire is wrong!