दाढेगाव बंधार्‍यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

नवीन पुलासाठी आंदोलनाचा इशारा

सिडको : विशेष प्रतिनिधी
दाढेगाव बंधार्‍यावरून दुचाकीसह वाहून गेलेल्या 28 वर्षीय अभिषेक अनिल जाधव (रा. कदम मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड) याचा मृतदेह अखेर 72 तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर पिंपळगाव खांब बंधार्‍याजवळ सापडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून दाढेगाव बंधार्‍याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे दाढेगाव बंधार्‍यावरून पाणी वाहत असताना अभिषेक जाधव दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सलग तीन दिवस शोधमोहीम राबविली. आज दुपारच्या सुमारास पिंपळगाव खांब बंधार्‍याजवळ पाण्यात मृतदेह वाहत आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी त्याची ओळख अभिषेक जाधव अशी पटविली. अभिषेकच्या वडिलांचे आजारामुळे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आई शुभांगी जाधव व अभिषेक हे जय भवानी रोड येथे राहत होते. अभिषेकच्या दुर्दैवी निधनाने आई शुभांगी जाधव यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलाचे निधन झाल्याने कुटुंबाचा आधारवड हरपला.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक केशव पोरजे, सिडको विभागीय सभापती बाळकृष्ण शिरसाठ, नगरसेवक भगवान दोंदे, अंकुश भोर,मदन डेमसे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, दाढेगाव बंधारा सुमारे 40 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निधीतून उभारण्यात आला असून महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या बंधार्‍याची आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या बंधार्‍यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून 20 ते 25 जणांचा बळी गेल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी दाढेगाव येथे नवीन पूल उभारण्याची मागणी केली आहे.
सिंहस्थ निधी किंवा आपत्कालीन निधीतून यावर्षी पुलाला मंजुरी न मिळाल्यास पाथर्डी, पिंपळगाव, दाढेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. शासनाने आणखी जीवितहानी होण्याची वाट न पाहता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Body of youth washed away at Dadhegaon weir found.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *