‘एसबीआय’वर सायबर हल्ला

मुंबई : प्रतिनिधी
देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या डिजिटल यंत्रणेला लक्ष्य करून झालेल्या संशयित सायबर घुसखोरी प्रकरणात आता नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीबीडी बेलापूर येथील बँकेच्या ग्लोबल आयटी सेंटरमधील सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकार्‍याने दिली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरातील एसबीआय ग्राहकांमध्ये चिंता पसरली आहे.
यात सर्वात महत्त्वाचा गोंधळ आकड्याबाबत आहे. हॅकरने 3.75 लाख नोंदी चोरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, एसबीआयने 21 ऑक्टोबर रोजी शेअर बाजाराला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, डार्क वेबवर आढळलेल्या सुमारे 3.75 लाख नोंदींच्या प्राथमिक तपासणीत 3,897 ग्राहकांच्या नोंदींमध्ये वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती आढळली आहे. त्यात नाव, लिंग, नोंदणीकृत मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल, घरचा पत्ता, शाखेचा तपशील, कस्टमर क्रमांक, लीड आयडी आणि कर्ज / लीडशी संबंधित मेटाडेटा यांचा समावेश असल्याचे बँकेने म्हटले आहे.

हल्ला नेमका कसा झाला?

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, ही घुसखोरी 9 ऑक्टोबर दुपारी 4.13 वाजल्यापासून ते 15 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत- म्हणजे तब्बल सहा दिवस सुरू होती. ’ सिरीयुझिम’ या नावाने वावरणार्‍या हॅकर / गटाने योनो अ‍ॅप आणि रास या अ‍ॅप्लिकेशन्सशी संबंधित 32 सीएसव्ही फाईल्स, 2 जेसन फाईल्स आणि 2,721 पीडीएफ फाईल्स – ज्यात कर्ज अर्ज, खाते उघडण्याचे फॉर्म यांचा समावेश असल्याचा दावा आहे. 16 ऑक्टोबर रोजी बँकेच्या थ्रेट इंटेलिजन्स पुरवठादार, डिफेन्स सायबर एजन्सी आणि सर्ट-इन कडून अलर्ट मिळाल्यानंतर बँकेने आपली सायबर घटना प्रतिसाद प्रक्रिया सुरू केली. सर्ट-इन मान्यताप्राप्त स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेकडून आता स्वतंत्र तपास सुरू आहे. सीबीडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात बीएनएस आणि आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुमचे पैसे सुरक्षित आहेत का ?
एसीबीआयने स्पष्ट केले आहे की, या घटनेचा बँकेच्या मुख्य बँकिंग कामकाजावर, आर्थिक कामगिरीवर किंवा सेवांच्या सातत्यावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम झालेला नाही. म्हणजे खात्यातील पैसे थेट गेले, असे आतापर्यंत समोर आलेले नाही. पण धोका दुसराच आहे. नाव, मोबाईल, जन्मतारीख, पत्ता आणि कस्टमर नंबर हातात आल्यावर फसवणूक करणारे बँक अधिकारी असल्याचे भासवून फोन / ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट कर्ज अर्ज करू शकतात. म्हणूनच डिजिटल हक्क संघटना आणि इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन यांनी बँकेने प्रभावित ग्राहकांना थेट वैयक्तिक सूचना दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तपास अद्याप सुरू आहे

डेटा नेमका कुठून गेला – मुख्य सर्व्हरमधून, बाह्य सेवा पुरवठादाराकडून की कर्ज प्रक्रियेतील मध्यस्थाकडून – याचा अंतिम निष्कर्ष अजून आलेला नाही. त्यामुळे 3.75 लाख ग्राहकांचा डेटा चोरीला गेला, असे ठामपणे म्हणता येणार नाही, पण 3,897 ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर आढळली, हे एसबीआयने स्वतः मान्य केले आहे.

ग्राहकांनी काय करावे?
1) बँकेच्या नावाने आलेला कोणताही कॉल / एसएमएस / लिंकवर ओटीपी, पिन, सीव्हीव्ही देऊ नका.
2) योनो / नेट बँकिंगचा पासवर्ड बदलून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवा.
3) अनोळखी नंबरवरून तुमचा डेटा लीक झाला, खाते बंद होईल असे सांगून आलेला कॉल आला तर लगेच बँकेच्या अधिकृत हेल्पलाइनवर खात्री करा.
4) स्टेटमेंटमध्ये अनोळखी व्यवहार दिसला तर तत्काळ बँकेला कळवा.

Cyberattack on SBI

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *