स्टेट बँक चौपाटी परिसरातील अनधिकृत टपर्‍यांवर मनपाची कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या नवीन नाशिक अतिक्रमण विभागाने बुधवारी स्टेट बँक चौपाटी परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सात ते आठ अनधिकृत टपर्‍यांवर कारवाई केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. नवीन नाशिक विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे आणि आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे गाडीप्रमुख निखिल तेजाळे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे
पार पाडली.
स्टेट बँक चौपाटी परिसरात गेल्या काही काळापासून रस्त्याच्या कडेला अनधिकृत टपर्‍या उभारण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच पादचार्‍यांनाही ये-जा करण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमण विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईचा निर्णय घेतला. कारवाईदरम्यान सात ते आठ अनधिकृत टपर्‍या हटविण्यात आल्या. यासाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, वाहनचालक तसेच आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारवाईदरम्यान आवश्यक खबरदारीही घेण्यात आली. महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी वाढत असलेल्या अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे अशा मोहिमा राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांना सुरक्षित, मोकळे आणि वाहतुकीसाठी सुलभ रस्ते उपलब्ध करून देणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. शहरातील सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे टपर्‍या किंवा अन्य बांधकामे उभारणार्‍यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले असून, नागरिकांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करू नये आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Municipal Corporation takes action against unauthorized stalls in the State Bank Chowpati area.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *