चार विधिसंघर्षित बालके ताब्यात; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सिडको : प्रतिनिधी
मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणार्या चार विधिसंघर्षित बालकांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून 2 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 11 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिक शहरासह पालघर आणि धुळे जिल्ह्यातील एकूण नऊ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस
आले आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार अर्जुन कांदळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दत्तनगर, अंबड परिसरात सापळा रचून चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चार, गंगापूर पोलीस ठाण्याचे दोन, सातपूर पोलीस ठाण्याचा एक, पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्याचा एक आणि धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्याचा एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले. तसेच अन्य दोन चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने हिरो स्प्लेंडर, हिरो स्प्लेंडर प्रो, बजाज बॉक्सर आणि होंडा युनिकॉर्न या दुचाकींचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नऊटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील, संदीप शेवाळे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.
Theft of two-wheelers for fun