शहरातील पुतळे-स्मारके बनावित भावी पिढीसाठी स्फूर्तिस्थाने

– मुकुंद बाविस्कर

नाशिक शहराला ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्ध वारसा लाभलेला आहे. या शहरामध्ये विविध प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि ऐतिहासिक परिसरांमध्ये थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी यांची स्मारके व पुतळे उभारण्यात आली आहेत. जुने सीबीएस परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, शिवाजी रोडवर महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य पुतळा तथा स्मारक आहे. शहरात मध्यवर्ती शालिमार चौक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहेत. विशेष म्हणजे मुंबई नाका परिसरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त आणि भव्य स्मारक तथा पुतळा अलीकडेच उभारण्यात आला आहे. याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, माजी पंतप्रधान राजीव गांधी तसेच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृत्यर्थ दादासाहेब फाळके स्मारक आहे.
गेल्या आठवड्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे तथा स्मारकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. पुतळे आणि स्मारके आपली प्रेरणास्थाने आहेत. मात्र या पुतळ्यांची आणि स्मारकांची देखभाल नियमितपणे होणे आवश्यक आहे. केवळ जयंती आणि पुण्यतिथीला या पुतळ्यांची आठवण येते आणि कदाचित त्याचवेळी या पुतळ्यांच्या परिसरात साफसफाई व स्वच्छता करण्यात येते. वर्षभर मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी परिस्थिती दिसून येते. मात्र, भावी पिढीसाठी महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके प्रेरणास्थान बनायला हवीत, त्याबद्दल नव्या पिढीला नियमितपणे माहिती द्यायला हवी. यासंदर्भात त्या ठिकाणी फलक देखील उभारले जावेत, अशी अपेक्षा सजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे .
श्रीश्याम झुला महोत्सव उत्साहात
फुलांची सजावट, भजनसंध्या :
गंगापूर रोडवरील श्री बालाजी लॉन्स येथे श्रीश्याम सेवक मंडळ, नाशिक व श्री श्याम सेवक केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री श्याम बाबांचा झुला महोत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातून हजारो श्याम भक्तांनी हजेरी लावली. श्रावण महिन्यात उत्तर भारतीय बांधवांकडून साजरा होणार्‍या झुला महोत्सवात श्यामबाबांना फुलांनी सजवलेल्या झुल्यावर झुलवण्याची परंपरा आहे. यंदा महोत्सवासाठी खास कोलकाताहून मागवलेल्या 1 हजार जुई फुलांसह विविध नैसर्गिक फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भजन संध्येत वंशिका बैरागी (रायपूर), राजू बैरागी (रायपूर), राकेश बावलिया (मुंबई), सुरेश पारीक (नाशिक) यांच्यासह मुंबई येथील गणेश म्युझिकल ग्रुप व श्याम सेवा समितीच्या भजन गायकांनी सादर केलेल्या भजनी कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
आनंद शिंदे यांना प्रल्हाद
शिंदे पुरस्कार प्रदान :
दादासाहेब फाळके कलावंत रंगमंच व स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे फाउंडेशनतर्फे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे जन्मोत्सव सोहळा येथे नुकताच झाला. शिंदेशाहीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना पहिला स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक मोहन अढांगळे होते. गौतम पगारे यांच्या हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला. गायक संतोष जोधळे, चेतन लोखंडे, राहुल लेनार, अनिल लेनार, जयपाल धिवरे यांनी गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संयोजन चंद्रकांत गायकवाड, राजेश जाधव, राजेश गुरव आदींनी केले.
पंचभाई लिखित ‘लढवय्या
नायक’ कादंबरीचे प्रकाशन
कामगार चळवळीतील लढवय्ये नेते शिरीष भावसार यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित लेखक विलास पंचभाई लिखित लढवय्या नायक या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पार पडले. माजी कामगार मंत्री हेमंतराव देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता कामगार महासंघाचे गोपाळराव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाजपच्या नगरसेविका प्रतिभा पवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा अँड महिंद्राचे माजी व्हा. प्रेसिडेंट हिरामण आहेर तसेच लेखक राजेंद्र उगले उपस्थित होते. प्रकाशनप्रसंगी हेमंत देशमुख यांनी शिरीष भावसार यांनी कामगार हक्कांसाठी दिलेला लढा आणि त्यांचे संघर्षमय कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. लेखक विलास पंचभाई यांनी हा जीवनप्रवास अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीत मांडल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वानंद संस्थेत काव्यसंध्या रंगली :
विविध आशयाच्या एकापेक्षा एक सरस कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केल्याने ज्येष्ठ कवयित्री अलका अमृतकर आणि आसावरी रोकडे यांची स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेत आशयसंपन्न काव्यसंध्या उत्तरोत्तर रंगत गेली. येथील शिकरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात ज्येष्ठ कवयित्री अलका अमृतकर आणि आसावरी रोकडे यांच्या स्वरचित काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. सुनंदा गोसावी अध्यक्षस्थानी होत्या. कवयित्री अलका अमृतकर यांनी शब्द माध्यम असता आणि माझं कपाट या कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुनंदा गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सादरीकरण केलेल्या कवितांचे कौतुक करत स्वरचित सायकल या कवितांचे सादरीकरण करत वाहवा मिळवली.
रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा :
अमृतानुभव संगीतमय मैफलीत श्रोते तल्लीन होऊन गेले होते. मोगरा फुलला, घनु वाजे घुणघुणा, पैल तो गे काऊ, अवाचिता परिमळू यांसारखे संत ज्ञानेश्वरांचे अभंग अन् त्यांच्या सोबतीला संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानंद ग्रंथाचे निरूपण ऐकून श्रोते तल्लीन झाले होते. कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम रंगला. त्यात विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी ओघवत्या शैलीत अमृतानुभव ग्रंथातील अध्यात्म, आत्मज्ञान, अद्वैत तत्त्वज्ञान व जीवनमूल्यांचे निरूपण केले.
तसेच ज्ञानदेवांच्या अभंगांचे गायन केले. अलंकापुरी पुण्यभूमी या रचनेने व नामगजराने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उत्तरार्धात रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा, अरे अरे ज्ञाना तोडी आणि अजी सोनियाचा दिनू या अभंगांनी मैफलीला आगळ्या ढंगावर नेले. पं. शंकरराव वैरागकर, सुज्ञान वैरागकर व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह अ‍ॅड. राजेंद्र डोखळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नृत्याली अकॅडमीतर्फे
सांस्कृतिक कार्यक्रम सादर :
नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे कालिदास कलामंदिर येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन कला, संस्कार, सामाजिक जाणीव आणि आंतरराष्ट्रीय यशाचा अप्रतिम संगम ठरले. चिमुकल्या विद्यार्थिनींपासून वरिष्ठ कलाकारांपर्यंत सर्वांनी भरतनाट्यमच्या विविध रचनांमधून आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. छोट्या शिष्यांनी ससा ससा, किलबिल किलबिल पक्षी बोलती, नाच रे मोरा आणि ए आई, मला पावसात जाऊ दे या जुन्या मराठी बालगीतांवर भरतनाट्यमच्या हस्तमुद्रा व अभिनय सादर केला. वरिष्ठ शिष्यांनी भो शंभो शिवशंभो स्वयंभो या रचनेतून भगवान नटराजाचे दर्शन घडवले. नृत्यालीच्या संचालिका व गुरू सोनाली करंदीकर यांनी या शिष्यांचा विशेष सत्कार केला. प्रिया करंदीकर-पांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
कलानंदतर्फे कथक नृत्याविष्कार :
कलानंद कथक नृत्य संस्थेचा वार्षिक कार्यक्रम कथक विधा महाकवी कालिदास कलामंदिरात मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. संस्थेने या कार्यक्रमाद्वारे यंदा 47 व्या वर्षात पदार्पण केले. नवोदित विद्यार्थिनींपासून ते पदवीधारकांपर्यंतच्या शिष्यांनी आपल्या नृत्याविष्काराने नाशिककर रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची दैदिप्यमान सुरुवात शिवस्तुती आणि शिवध्रुपदने झाली. गुरू संजीवनी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या लयबद्ध शिववंदनेने सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
यानंतर बालकलाकारांनी गुरुस्तवन, कृष्णभजन तसेच तीनताल आणि झपताल यांसारख्या तालांमधील कसरती सादर केल्या. सुश्री शाश्वती सेन यांनी बसवलेले नऊ मात्रांचे बसंत ताल हे प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले. पाठोपाठ डॉ. समुखी अथणी यांनी मल्हार रागातील बिजुरी चमके ही बंदीश आपल्या बहारदार नृत्यातून साकारली.

Transform the city’s statues and memorials into sources of inspiration for future generations.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *