संतश्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज

– अनंत बोरसे,

नाचू कीर्तनाचे रंगी,
ज्ञानदीप लावू जगी॥
(संत नामदेव)
आपल्या देशाला आणि राज्याला अनेक संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. त्यांचे इतिहासातील कार्य नेहमीच आपल्याला स्फूर्तिदायक राहिले आहे. अशाच थोर संत परंपरेत अग्रणी असलेल्या ‘संत शिरोमणी नामदेव’ यांची पुण्यतिथी देशातील आणि राज्यातील शिंपी बांधव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असतात. यंदा संत शिरोमणी नामदेव यांची 676 वी पुण्यतिथी साजरी होत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी (बामणी) गावात आई गोणाई यांच्या पोटी प्रभव नाम संवत्सर, शके 1192(ई.स.1270) 26 ऑक्टोबर 1270 रोजी कार्तिक शुद्ध एकादशी, रोहिणी नक्षत्रास रविवारी संत नामदेव यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी, व्यवसायाने ‘शिंपी’ असलेले हे कुटुंब. दामाशेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय हे ‘विठ्ठल भक्त’. बहीण आऊबाई. पिढ्यान्पिढ्या सात्त्विक प्रवृत्तीचे भगवतभक्त हे कुटुंब. या कुटुंबाचे आडनाव रेळेकर. संत नामदेव यांचे बालपण पंढरपुरात गेले. नामदेवांनी लहानपणापासूनच निस्सीम विठ्ठल भक्ती केली. संत नामदेव यांचे वयाच्या 11 वर्षी लग्न झाले. त्यांना 80 वर्षांचे आयुष्य लाभले आणि नामा आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती वरी असे म्हणत आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 (शनिवार, 3 जुलै 1350) रोजी पंढरपूर येथे वारकरी, साधुसंत यांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पांडुरंगचरणी ‘पायरीचा दगड’ होण्यात धन्यता मानली. अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचं सर्वकाही होता. आई-बाप सोयरा सखा गुरू देव स्वामी तोच होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी प्रसिद्ध कथा आहे. पुढे दगडाचा देव बोलत नाही, अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणार्‍या नामदेवांनी लहानपणीच आध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला. संत नामदेव विठ्ठलास नैवेद्य अर्पण केल्याखेरीज स्वतः कधीच अन्नग्रहण करीत नसत. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’. 1291 मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, ‘विसोबा खेचर’ हे त्यांना गुरू म्हणून लाभले. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या या क्रांतीचं नेतृत्व नामदेवांनी केलं. नामदेव महाराजांनी भक्त संप्रदायाची ध्वजा महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, पंजाब आदी राज्यांतदेखील पोहोचवली. नामदेव महाराजांच्या मते ईश्वरप्राप्तीचा सरळ, साधा, सोपा मार्ग हा केवळ ‘नामस्मरण’च आहे. पंजाबमधील शीख बांधव त्यांना ‘नामदेव बाबा’ म्हणतात. पंजाबमध्ये त्यांना बहीरदास, विष्णूस्वामी, केशव कलाधारी, असे शिष्य त्यांना लाभले. पंजाबमध्ये धुमान येथे, तर राजस्थानमध्येदेखील शीख बांधवांनी नामदेव महाराज यांचे मंदिर बांधले आहे. गुरू ग्रंथसाहिबातदेखील नामदेवांची 61 पदं समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात आरतीच्या शेवटी
घालीन लोटांगण, वंदीन चरण…. भावे ओवाळीन म्हणे नामा ॥ असे आवर्जून म्हटलेच जाते.

The supreme saint and crest-jewel of saints, Sant Namdev Maharaj.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *