– मच्छिंद्र ऐनापुरे
भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळा पासूनच देशभक्ती हा प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा आणि चित्रपटांच्या यशाचा विश्वासार्ह आधार ठरलेला विषय आहे. काळ बदलला, समाज बदलला आणि प्रेक्षकांची अभिरुचीही बदलली; मात्र देशप्रेमाची भावना आजही तितकीच प्रभावी आहे.
फरक एवढाच की, पडद्यावर व्यक्त होणार्या देशभक्तीचे स्वरूप आता अधिक व्यापक आणि विविधांगी झाले आहे. प्रत्येक काळातील चित्रपट निर्मात्यांनी त्या वेळची सामाजिक आणि राजकीय गरज ओळखून देशभक्ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडली. काही चित्रपटांनी स्वातंत्र्यलढ्यातील नायकांच्या शौर्यकथा सांगितल्या, काहींनी भारत-पाकिस्तान युद्धांची पार्श्वभूमी घेतली, तर काहींनी गुप्तहेरांच्या साहसकथांमधून राष्ट्रप्रेमाची भावना जागवली.
व्यावसायिकदृष्ट्याही हा फॉर्म्युला प्रभावी ठरला. कारण देशभक्तीपर चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एकाच वेळी देशाभिमान, संवेदना आणि रोमांच निर्माण करतात. दीर्घकाळ ही भावनिक ताकदच अशा चित्रपटांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण ठरली. मात्र, आजचा प्रेक्षक केवळ देशप्रेमाच्या घोषणा किंवा रणांगणावरील शौर्य पाहून समाधानी होत नाही. त्याला देशप्रेमासोबत मानवी संघर्ष, नैतिक द्वंद्व, ऐतिहासिक वास्तव, राजकीय गुंतागुंत आणि खर्या घटनांची पार्श्वभूमी असलेल्या कथा अधिक भावतात. त्यामुळे देशभक्ती आता केवळ मोठ्या पडद्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ओटीटीच्या माध्यमातून तिचे अनेक नवे पैलू प्रेक्षकांसमोर येत आहेत.
.देशभक्तीपर चित्रपटांचा एक मोठा काळ भारत-पाकिस्तान संघर्षाभोवती फिरत राहिला. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे शौर्य, त्याग आणि मातृभूमीसाठीचे बलिदान हे या कथांचे केंद्र होते. ‘बॉर्डर’, ‘बॉर्डर-2’, ‘एलओसी : कारगिल’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या चित्रपटांनी युद्ध आणि देशभक्तीची सांगड घालत प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडले. सैनिकांचे शौर्य, कुटुंबापासून दूर राहण्याची वेदना आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना या चित्रपटांमधून प्रभावीपणे समोर आली. दुसरीकडे, ‘गदर’ आणि ‘गदर-2’ यांनी प्रेमकथा आणि राष्ट्रवाद यांचे अनोखे मिश्रण सादर केले. भावनिक कथानक, आक्रमक राष्ट्रप्रेम आणि मनोरंजन यांचा मेळ साधत या चित्रपटांनी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आणि बॉक्स ऑफिसवरही उल्लेखनीय यश मिळवले.
देशभक्तीचे बदलते रंग
काळ जसजसा पुढे गेला, तसतसे देशभक्तीचे सिनेमातील रूपही बदलले. चित्रपट निर्माते केवळ युद्ध, शत्रू आणि विजय याभोवती कथा गुंफण्याऐवजी देशप्रेमाच्या अधिक सूक्ष्म आणि मानवी बाजू मांडू लागले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘राजी’. या चित्रपटात ना आक्रमक राष्ट्रवादाचा अतिरेक आहे, ना पाकिस्तानविरोधी घोषणांचा भडिमार. एका सामान्य भारतीय तरुणीचा गुप्तहेर म्हणून सुरू होणारा प्रवास आणि देशासाठी तिला करावा लागणारा नि:शब्द त्याग यामधून दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी देशप्रेम म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर अनेकदा स्वतःचे अस्तित्व आणि भावना बाजूला ठेवून केलेला त्यागही असतो, हे प्रभावीपणे मांडले. ‘सरदार उधम’नेही देशभक्तीला वेगळा आयाम दिला. जालियनवाला बाग हत्याकांडाची वेदना, त्यातून निर्माण झालेला संताप आणि प्रतिशोधाची भावना या सर्वांचा अत्यंत संयत आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून मागोवा या चित्रपटाने घेतला. अशा चित्रपटांमुळे देशभक्तीपर सिनेमा केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता इतिहासाच्या वेदना, संघर्ष आणि स्मृती जिवंत ठेवणारे प्रभावी माध्यम बनला आहे. आज देशभक्तीपर चित्रपट केवळ जोश निर्माण करण्यापुरते मर्यादित नाहीत. ते इतिहास, राजकारण, कूटनीती, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी मूल्यांवरही विचार करायला भाग पाडतात. हीच भारतीय सिनेमाच्या प्रगल्भतेची खूण आहे.
विस्तारलेला आवाका
अलीकडच्या काळात देशभक्तीपर चित्रपटांचा आवाका आणखी विस्तारला आहे. ‘शेरशाह’मध्ये कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे जीवन संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे मांडण्यात आले. ‘केसरी’ने ब्रिटिश इंडियन आर्मीच्या 21 शीख सैनिकांच्या शौर्याची कथा सांगितली, तर ‘सॅम बहादूर’ने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्वगुण आणि 1971च्या युद्धातील त्यांची भूमिका प्रभावीपणे उभी केली.या चित्रपटांनी एक महत्त्वाचा संदेश दिला- देशभक्ती म्हणजे केवळ हातात शस्त्र घेऊन रणांगणात उतरणे नव्हे; दूरदृष्टी, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि नैतिक धैर्य यांचाही देशसेवेत तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. ‘आर्टिकल 370’ने जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविण्याच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रियेला सिनेमाच्या माध्यमातून मांडले. ‘स्काय फोर्स’ने भारतीय वायुसेनेच्या सुरुवातीच्या काळातील धाडसी मोहिमांवर प्रकाश टाकत वायुसैनिकांच्या योगदानाची कथा प्रेक्षकांसमोर आणली. म्हणजेच, देशभक्तीचा पट आता सैनिकांपासून गुप्तहेरांपर्यंत, राजकारणापासून कूटनीतीपर्यंत आणि इतिहासापासून राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत विस्तारला आहे.
ओटीटीच्या आगमनामुळे देशभक्तीपर कथांना आणखी मोठे व्यासपीठ मिळाले. पारंपरिक चित्रपटांपेक्षा वेब सीरिजमध्ये कथानकासाठी अधिक वेळ उपलब्ध असल्याने पात्रांचे आयुष्य, त्यांचे संघर्ष आणि घटनांची पार्श्वभूमी अधिक सविस्तरपणे मांडता येते. ‘स्पेशल ऑप्स’ने भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या संघर्षाची कथा रंजक पद्धतीने मांडली. ‘द फॅमिली मॅन’ने देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्ये यांच्यात समतोल साधताना एका गुप्तचर अधिकार्याला करावा लागणारा संघर्ष प्रभावीपणे दाखवला.
The Changing Hues of Patriotism: A Journey from the Battlefield to OTT