लासलगाव बाजार समिती : डाळिंबाला 5,100 रुपये प्रतिक्रेटचा दर
लासलगाव : वार्ताहर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात डाळिंबासह पपई व पेरूच्या लिलावास (दि. 10) उत्साहात सुरुवात झाली. मुहूर्तावर डाळिंबाला 5,100 रुपये प्रतिक्रेटचा दर मिळाला.
नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकर्यांच्या सोयीसाठी बाजार समितीच्या वतीने गेल्या 11 वर्षांपासून डाळिंब लिलाव सुरू करण्यात आला आहे. शेतकर्यांनी शेतमाल योग्य प्रतवारी करून आणावा, वजनमापानंतर लगेचच रोख रक्कम (पेमेंट) दिले जाईल, तसेच खरेदीदारांच्या स्पर्धेमुळे चांगला बाजारभाव मिळेल, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. इच्छुक व्यापार्यांना तात्काळ परवाने देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार
आहे.
याप्रसंगी बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, प्रभारी हिरालाल सोनारे, व्यापारी सय्यद मोहसीन सय्यद मुश्ताक, जाकीर शेख, तौसीफ बागवान यांच्यासह अनेक व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुहूर्ताचा लिलाव व आवक
डाळिंब : विंचूर येथील शेतकरी निलेश दरेकर यांच्या डाळिंब क्रेटचे पूजन करून लिलाव झाला. मदिना फ्रुट अँड व्हेजीटेबल कंपनीने मुहूर्ताचा डाळिंब रु. 5,100 प्रति क्रेट दराने खरेदी केला. दिवसभरात 305 क्रेट्सची आवक झाली. (दर -किमान रु. 100, कमाल रु. 2,500, सर्वसाधारण रु. 1,500 प्रति क्रेट).पपई : 15 क्रेट्सची आवक. (दर- किमान रु. 200, कमाल रु. 460, सर्वसाधारण रु. 400 प्रति क्रेट).पेरू: 10 क्रेट्सची आवक. (दर- किमान रु. 600, कमाल रु. 1,200, सर्वसाधारण रु. 1,000 प्रति क्रेट).
Auctions for papaya and guava begin alongside pomegranates.