पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

सिडको : प्रतिनिधी
मेरी लिंकरोडवरील मानेनगर (शुभम कॉलनी) परिसरात घराच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. 15) रात्री घडली. तृप्ती विशाल सोनवणे (वय 8) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय 6) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेनगरातील शुभम कॉलनी येथे डॉ. विशाल सोनवणे हे कुटुंबासह राहतात. रासबिहारी-मेरी लिंकरोडवर त्यांचे क्लिनिक असून, त्यांच्या पत्नीही वैद्यकीय व्यवसायात त्यांना मदत करतात. शनिवारी सायंकाळी सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत असताना दोन्ही मुली घरी होत्या. रात्री एका रुग्णाला सलाईन लावण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिकमध्ये थांबवून घरी जात दोन्ही मुलींना जेवण दिले. ‘आई लगेच घरी येईल’, असे सांगून त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून ते पुन्हा
क्लिनिकमध्ये परतले.
काही वेळाने रुग्णाची सलाईन संपल्यानंतर डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिक बंद करून घरी जाण्यास सांगितले. त्या घरी पोहोचल्यानंतर कुलूप उघडून आत गेल्या. मात्र, दोन्ही मुली घरात दिसून न आल्याने त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी स्वयंपाकघरालगतच्या गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी टाकीत डोकावून पाहिले असता एका मुलीचे केस पाण्यात दिसले. त्यांनी तातडीने तिला टाकीतून बाहेर काढले. त्यानंतर दुसरी मुलगीही टाकीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन्ही मुलींना बाहेर काढल्यानंतर त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळापासून अंतर असल्याने डॉ. सोनवणे यांनी शेजारी अमोल पोतदार यांच्यासह इतरांना तातडीने मदतीसाठी धाव घेण्यास सांगितले. शेजार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलींना रात्री सुमारे 10.35 वाजता अपोलो रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी रात्री 11.10 वाजता दोन्ही मुलींना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने यांनी म्हसरूळ पोलिसांना कळविले. पोलीस हवालदार कवीश्वर खराटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. रविवारी दुपारी दोन्ही बहिणींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Two sisters die after falling into a water tank.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *