नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागाकडे नागरिकांनी 1 एप्रिल ते 5 जूनदरम्यान घरपट्टीचा 57 कोटी 27 लाख तर पाणीपट्टीचा 10 कोटींचा कर भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरपट्टीच्या वसुलीत 37 कोटींची तर पाणीपट्टीत 5 कोटींची वसुली अधिक झाली आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिकार्यांना विशेष सूचना दिल्यानंतर कर वसुलीचे प्रमाण वाढले आहे.
नाशिकमध्ये अनेकांनी पाणीपट्टी आणि घरपट्टी थकवली आहे. थकीत पाणी आणि घरपट्टीचा आकडा वाढत आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवण्यात येणार आहे. ढोल वाजवूनदेखील पैसे न दिल्यास आशा थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, सोफा अशा विविध गोष्टींचा समावेश असणार आहे.
पाणीपट्टी आणि घरपट्टी हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असते; मात्र अनेक जण ती भरत नाहीत. करवसुली न झाल्याने उत्पन्नात घट होते. त्यामुळे महसुलाला मोठा फटका बसतो. आता नाशिक महापालिकेने अशा थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. जे बडे थकबाकीदार आहेत त्यांच्या घरापुढे जाऊन ढोल वाजवण्यात येणार आहे. घरासमोर ढोल वाजवल्याने तरी ते घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरतील, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. शहरात अनेकांनी घरपट्टी तसेच पाणीपट्टी न भरल्याने थकबाकीचा डोंगर आहे. थकबाकी वसूल होत नसल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या वर्षीपेक्षा घरपट्टीची 37 कोटी 43 लाख रुपयांची वाढ झाली आहे. तर पाणीपट्टीत 5 कोटी 89 रुपये वाढ झाली आहे.