जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मुंबई :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर केला आहे. तसेच सचिन अंदुरे याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट 2013 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. यापूर्वी दाभोलकर प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आता सचिन अंदुरेलाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ऑगस्ट 2013 मध्ये दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करू. यापूर्वी शरद कळसकर याला खालच्या कोर्टात शिक्षा झाली होती. मात्र, त्याला उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. आम्ही त्याविरोधात
सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो, अशी प्रतिक्रिया डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर परिसरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. त्यानंतर 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उइखने तपास हाती घेतला. तपासादरम्यान अनेक आरोपींची नावे समोर आली आणि कटाचा तपास करण्यात आला.
तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
10 मे 2024 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड सुनावला. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सीबीआयने तावडे यांना कथित सूत्रधार म्हणून मांडले होते; मात्र न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध दोष सिद्ध करण्याइतका पुरावा मिळाला नाही. त्यानंतर आता शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Bail granted to Andure, the prime accused in the Dr. Dabholkar murder case.