अखेर नाशिक जिल्ह्याला ‘पालक’ मिळाले!

तिढा सुटला : गिरीश महाजन यांचीच सरशी

नाशिक : देवयानी सोनार
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला. गेल्या दोन वर्षांपासून पालकमंत्रीपदाचे घोंगडे भिजत पडले होते. यापूर्वी पालकमंत्रीपदाच्या निवडी जाहीर झाल्यानंतर विरोध झाल्याने 24 तासात निर्णय बदलून पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचे घोंगडे भिजत पडले होते. कधी ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ तर कधी शिंदे गटाचे दादा भुसे यांच्यात पालकमंत्रीपदावरुन तीव्र स्पर्धा निर्माण झाली होती. त्यामुळे बरेच दिवस पालकमंत्रीपदाचे घोंगडे भिजत पडले होते. पालकमंत्री नसल्याने डीपीडीसीच्या निधी, बैठका यांचाही तिढा निर्माण झालेला होता. यावर पर्याय म्हणून सिंहस्थ कुंभमेळा मंत्री हे नवीन मंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्या खांद्यावर टाकली होती. दोनच दिवसांपूर्वी सिंहस्थ पुस्तिकेत गिरीश महाजन यांचा उल्लेख पालकमंत्री म्हणून केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, काल अधिकृतरित्या पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाल्याने अखेर नाशिकला पालक मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. आगामी सिंहस्थ आणि पालकमंत्री म्हणून असणारी जबाबदारी पार पाडण्याचे मोठे काम गिरीश महाजन यांच्यापुढे आहे.

यापूर्वी अघोषितपणे नाशिकचा कारभार पाहणार्‍या महाजनांच्या खांद्यावर आता जिल्ह्याच्या विकासाची अधिकृत राजकीय जबाबदारी आली असून, सिंहस्थ कुंभमेळा अभूतपूर्व करण्यासोबतच शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुमारे 34 हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आव्हान महाजनांसमोर आहे. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, घाट व कुंभमेळ्याशी संबंधित कामांसह शहरातील दैनंदिन प्रश्नांकडेही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी सुरू असलेली खोदकामे, अर्धवट कामे आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे नाशिककरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत आतापर्यंत सात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी महाजनांना यापूर्वीच लक्ष्य केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस यांच्यासह सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही विविध प्रश्नांवर आंदोलने करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनीही महाजनांवर निशाणा साधला होता, तर मंत्री दादा भुसे यांनीदेखील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या प्रश्नावर बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्रिपदाची अधिकृत जबाबदारी स्वीकारल्यानंतर विरोधकांच्या टीकेला सामोरे जाण्याचे आव्हानही महाजनांसमोर राहणार आहे.
महाजनांकडे आधीच कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने सिंहस्थाच्या नियोजनावर त्यांचे लक्ष आहे. आता पालकमंत्रिपदामुळे जिल्हा नियोजन, प्रशासनाशी समन्वय, शहरातील विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांची सोडवणूक यांचीही जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. सिंहस्थाच्या कामांना गती देतानाच शहरातील रखडलेली आणि अर्धवट कामे पूर्ण करणे, रस्त्यांची स्थिती सुधारणे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली हजारो कोटींची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान महाजनांसमोर आहे. त्यामुळे पालकमंत्रिपद हे केवळ राजकीय वजन वाढविणारे पद न ठरता त्यांच्या कार्यक्षमतेची कसोटीही ठरणार आहे. स्थानिक नेत्यांना डावलून पालकमंत्रिपद मिळवल्याची चर्चा असली तरी आता नाशिकमध्ये चांगले घडले, कामे मार्गी लागली किंवा विकासकामांमध्ये त्रुटी राहिल्या, या सर्वांची राजकीय जबाबदारी महाजनांच्या खांद्यावर असणार आहे.कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी, 34 हजार कोटींच्या विकासकामांना गती, शहरातील खड्डे आणि मूलभूत प्रश्नांची सोडवणूक तसेच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत नाशिकच्या विकासाची धुरा महाजनांना सांभाळावी लागणार आहे.

Nashik district finally gets a Guardian Minister!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *