दोन कुटुंबांच्या स्वप्नाला पूर्णविराम; पीएम आवास योजनेतून सिन्नरमध्ये गृहप्रवेश
सिन्नर : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना सिन्नरमधील दोन कुटुंबांसाठी हा दिवस आयुष्यभराची आठवण ठरला. वर्षानुवर्षे स्वतःच्या पक्क्या घराची वाट पाहणार्या विकास जगताप आणि सविता रवींद्र काळे यांच्या घराचे स्वप्न ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’मुळे प्रत्यक्षात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दोघांना घराच्या प्रतीकात्मक चाव्या देत गृहप्रवेश करण्यात आला. याच कार्यक्रमात आणखी 11 लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरी निधीची पत्रे देण्यात आली.
नगराध्यक्ष विठ्ठल उगले आणि मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर नगरपरिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला. चावी स्वीकारताना लाभार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद आणि समाधान उपस्थितांसाठीही भावनिक क्षण ठरला.
योजनेंतर्गत अरविंदकुमार सिंग, संतोष पांडे, जेबा शेख, सीताराम मेहत्रे, सोमनाथ गोजरे, प्रकाश जाधव, संगीता गायकवाड, मथुरा जगताप, सागर देशमुख, अमीर हुसेन सय्यद आणि एजाज सय्यद या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी निधीची पत्रे देण्यात आली.
घर उभारताना तांत्रिक मदत
घरकुलाचे बांधकाम करताना लाभार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी नगरपरिषदेचे शहर अभियंता सौरभ गायकवाड, सीएलटीसी अभियंता सुदर्शन लोखंडे आणि एमआय स्पेशालिस्ट रोशन चव्हाण यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्न करत आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल, असे मुख्याधिकार्यांनी सांगितले.
Received a home of one’s own on Independence Day.