मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर एसटी बस-ट्रकची धडक

दोन महिलांचा मृत्यू ; 23 प्रवासी जखमी

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील दहिवाळ शिवारात मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 19) सकाळी एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तब्बल 23 प्रवासी जखमी झाले. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला
पिंपळगाव बसवंत आगाराची नाशिक-पाचोरा एसटी बस 40 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जात होती. दहिवाळ शिवारात समोरून चाळीसगावकडून येणार्‍या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ व आक्रोश पसरला. या अपघातात इरशाद बी. रमजान मणियार (वय 60, रा. जामनेर), सखूबाई किरण माळी (वय 65, रा. एरंडोल) अशी मृत महिलांची नावे आहेत, तर प्रणिता ततार, राजेंद्र ततार, आशा ततार (सर्व रा. संगमेश्वर, मालेगाव), ऋतुजा सोनजे (नाशिक), अरमान पिंजारी (सोयगाव), गोकुळ भामरे, सुनंदा भामरे (नाशिक), सुहाना अझीसा, निधा अझीसा (मालेगाव) व रत्नाबाई अहिरे (टिंगरी) यांच्यासह 23 प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. जखमींना तातडीने मालेगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Two women died in a collision between an ST bus and a truck on the Malegaon-Chalisgaon road; 23 passengers were injured.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *