परिवहनमंत्री : आजपासून कारवाई
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे सक्तीचे करण्यात आले असून, गुरुवार(दि. 20 ऑगस्ट)पासून या नियमाची राज्यभरात कडक अंमलबजावणी सुरू होणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ज्या चालकांना मराठी बोलता येत नाही त्यांना भाषा अवगत करण्यासाठी प्रथम एका महिन्याची नोटीस दिली जाईल. या मुदतीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार देणार्या अमराठी चालकांचा परवाना आणि बॅज कायमस्वरूपी रद्द करण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल.
1989 च्या मोटार वाहन नियमांनुसारच रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक आहे, मात्र आता 12 ऑगस्ट 2026 च्या नवीन कायदेशीर तरतुदीनुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. यापुढे राज्यात कोणत्याही नवीन चालकाला रिक्षा किंवा टॅक्सीचा परवाना आणि बॅज देताना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)तील अधिकार्यांकडून त्यांची प्रत्यक्ष संवादाद्वारे मराठी भाषेची चाचणी घेतली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे ’व्हिडिओ रेकॉर्डिंग’ केले जाणार असून, चालकाला व्यावहारिक मराठीचे ज्ञान असल्याची खात्री झाल्यानंतरच नवीन बॅज दिला जाईल. यासाठी आता कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही.
खोट्या डोमिसाइल प्रमाणपत्रांबाबतही कारवाई
या अनिवार्य कारवाईसोबतच, रिक्षा-टॅक्सी परवाना मिळवण्यासाठी वापरल्या जाणार्या खोट्या अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्रांच्या तक्रारींवरही परिवहन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित व्यक्ती खरोखरच महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्यास आहे की नाही, याची पोलिसांमार्फत आणि प्रत्यक्ष पडताळणीद्वारे सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण राज्यव्यापी मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली असून, पुढील महिन्याच्या अखेरीस या कारवाईचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.
It is mandatory for auto-rickshaw and taxi drivers to know Marathi.