राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पाणी अडवा-पाणी जिरवा, असे सांगत जलसंधारणाचे महत्त्व सांगितले. त्यांचा जन्म दिवस 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मृद व जलसंधारण विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्त नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या माहितीवर आधारित हा लेख.
पावसाचे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे, उपलब्ध जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, ही आता काळाची गरज आहे. बदलते पर्यावरण, त्याचा हवामानावर होणारा विपरीत परिणाम, पावसाचे बदलते स्वरूप आणि वाढती पाण्याची गरज या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला केवळ पाण्याच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित न ठेवता ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार मानले जात आहे.
नाशिक जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून एकात्मिक प्रयत्न करण्यात येत आहेत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, जलयुक्त शिवार अभियान 2.0 आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 या प्रमुख योजनांमधून जलसाठे निर्माण करणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, गाळ काढणे, नाला खोलीकरण, मृदसंधारण तसेच सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. विशेष निधी आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून उपलब्ध निधीचा अधिक परिणामकारक वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे.
यातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना जलसंधारण आणि शेती या दोन्ही दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. जलाशयांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढल्यामुळे जलसाठ्याची क्षमता वाढण्यास मदत होते, तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
नाशिक जिल्ह्यात 15 जूनपर्यंत जलाशयातील गाळ काढण्याची 110 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 86 कामांमधून तब्बल 14.33 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
नाला खोलीकरणाच्या 23 कामांमधून 6.53 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे जलाशयांची साठवण क्षमता वाढविण्यासोबतच शेतजमिनीच्या गुणवत्तेलाही हातभार लागत आहे.
जलसंधारणाच्या कामांना अधिक परिणामकारक आणि पारदर्शक बनविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिओ पोर्टलचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध यंत्रणांचे एकूण पूर्ण झालेली 1819 कामे पोर्टलवर नोंदविणे अपेक्षित आहे. त्यापैकी 1313 कामांचे वर्क आयडी तयार करून कामे जिओ-टॅग करण्यात आली आहेत. उर्वरित कामांचे वर्क आयडी तयार करणे आणि जिओ-टॅगिंगची प्रक्रिया सुरू आहे. डिजिटल माध्यमातून कामांची नोंद आणि प्रत्यक्ष ठिकाणाची माहिती उपलब्ध होत असल्याने कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवणे अधिक सुलभ झाले आहे.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत विशेष निधीतून जिल्ह्यातील 231 गावांमध्ये 1132 कामांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी 760 कामे पूर्ण झाली असून, 4384.49 लाख रुपये खर्च झाला आहे.
जलसंधारणाची कामे केवळ एका विभागापुरती मर्यादित न ठेवता कृषी, वन, मृद व जलसंधारण, भूजल सर्वेक्षण व विकास, सामाजिक वनीकरण तसेच मनरेगा यंत्रणांच्या माध्यमातून विविध कामे राबविली जात आहेत. या विभागीय समन्वयामुळे उपलब्ध निधीचे अभिसरण करून जलसंधारणाच्या कामांना व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. सुधारित आराखड्याच्या माध्यमातूनही विविध विभागांच्या कामांचा समन्वय साधत जलसंधारणाची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 20 गावांचा समावेश असलेले 3 प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्प क्र.1 मधील बोढरी, चिराई, बहिराणे, वरचे टेंभे, खालचे टेंभे, इजमाने, मळगाव भामेर, बिजोरसे, प्रकल्प क्र.2 मधील जालखेड, कोकणगाव बु., श्रीरामनगर, ठेपणवाडी, वाघाड व प्रकल्प क्र.3 मधील वळवाडे, गारेगाव, वाळवाडी, खाकुर्डी, निमशेवडी, मोरदर या गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे करण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या डीपीआरला 16 ऑक्टोबर 2023 रोजी मान्यता मिळाली आहे.
या योजनेतील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकासाठी 1165.80 लाख रुपये मंजूर असून, मृद व जलसंधारण, कृषी व वनविभागाची 297 कामे त्यात समाविष्ट आहेत. त्यापैकी 270 कामे पूर्ण झाली असून, 987.00 लाख रुपये खर्च झाला आहे. म्हणजेच मंजूर निधीच्या सुमारे 84.66 टक्के खर्च झाला आहे. उर्वरित कामेही पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मृद व जलसंधारणाबरोबरच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि कार्यक्षम वापर व्हावा, यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील उत्पादन पद्धती घटकातून शेतकर्यांना सिंचनाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या घटकासाठी मंजूर 243.19 लाख रुपयांपैकी 239.87 लाख रुपये खर्च झाला आहे. पी.व्ही.सी. पाइप, विद्युत पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच कृषी यंत्रे व अवजारे यासाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे मृद व जलसंधारणातून उपलब्ध झालेल्या पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करून शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील जलसंधारणाची ही वाटचाल म्हणजे केवळ बंधारे, नाला खोलीकरण किंवा गाळ काढण्याची कामे नव्हेत; तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन करून भविष्यातील जलसुरक्षेचा पाया अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. पावसाचे पाणी अडविणे, भूजल पुनर्भरण करणे, जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, मृदसंधारण करणे आणि सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, या सर्व बाबींची सांगड या योजनांमधून घातली जात आहे.
जलसंधारण दिनाच्या निमित्ताने या कामांकडे केवळ झालेल्या कामांची आकडेवारी म्हणून न पाहता, नाशिक जिल्ह्याच्या भविष्यातील पाणी सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहणे गरजेचे आहे. विविध विभागांचे अभिसरण, तंत्रज्ञानाचा वापर, कामांचे जिओ-टॅगिंग, निधीचा प्रभावी वापर आणि शेतकर्यांच्या गरजांशी जोडलेली सिंचन व्यवस्था यामुळे जलसंधारणाला अधिक व्यापक आणि शाश्वत दिशा
मिळत आहे.
Integrated water conservation is underway in Nashik district.