बूथ मजबूत करा, लढाईसाठी मैदानात उतरा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजपा पदाधिकार्‍यांना सल्ला; उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा बैठक

नाशिक : प्रतिनिधी
‘एसआयआर’ची कामे तातडीने पूर्ण करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे.
लढाईची वेळ आली की, शेपूट घालण्याची भूमिका चालणार नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करायचे आहे. आगामी काळातील राजकीय आव्हानांसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक, नियोजनबद्ध आणि जबाबदारीने काम करावे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक बुधवारी (दि. 19) नाशिकमधील पंचवटी येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉल, आडगाव नाका येथे झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. पक्ष संघटना मजबूत करणे, बूथपातळीवरील यंत्रणा सक्षम करणे तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) कामाला गती देण्याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीस भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग, एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी, एसआयआर प्रदेश संयोजक किरीट सोमय्या, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि मेघना बोर्डीकर यांच्यासह आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, विभाग संयोजक व सहसंयोजक, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, एसआयआर प्रदेश व जिल्हा समिती सदस्य, एसआयआर विधानसभा प्रभारी तसेच बीएलए-1 श्रेणीतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
एसआयआर प्रक्रियेत आपण नेमके कुठे कमी पडतो आहोत, हे प्रत्येकाने ओळखून त्यावर काम करण्याची गरज आहे. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ नेत्यांचे नियोजन किंवा मोठ्या सभा पुरेशा नाहीत. प्रत्यक्ष बूथवर कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा असणे आवश्यक आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. राज्यभरात एक लाख 256 बूथवर एक व्यक्ती- एक बूथ या पद्धतीने काम करण्याचे प्रयत्न करण्यात आले असून, 93 हजार बूथवर बीएलएंची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही बूथवर संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक बूथवर जबाबदार कार्यकर्ता, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि निवडणुकीच्या दिवशी प्रभावी यंत्रणा उभी करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच आजची बैठक आमच्या संघटनेची झाली. प्रत्येक विभागाचा आढावा यानिमित्ताने घेतला जातो. यावेळी केंद्रीय मंत्रीही उपस्थित असल्याने त्यांचे चांगले मार्गदर्शन मिळते, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. एसआयआरच्या प्रभावी अंमलबजावणीसह आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बैठकीतून दिशा देण्यात आली.

भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा केवळ सदस्य नाही, तर तो लोकशाहीचा सैनिक आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या बूथवरील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचा. मतदार यादी तपासा. पात्र नागरिकांचे नाव राहिले असेल तर त्यांना योग्य प्रक्रिया समजावून सांगा. नाव, पत्ता किंवा इतर तपशिलात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना मदत करा. मात्र, हे काम करताना एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा. कायद्याच्या चौकटीत आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच काम करायचे आहे. कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही आणि अपात्र मतदारांची नोंद राहणार नाही, यासाठी जागरूक राहायचे आहे. – किरीट सोमय्या

गिरीश महाजनच एव्हरग्रीन

आजच्या सर्वच्या सर्व विषयांचे प्रमुख ना. गिरीश महाजन हेच आहेत. त्यामुळे एसआयआर असो वा कुंभमेळा, पालकमंत्री हेच सर्व विषयांचे प्रमुख आहेत. गिरीश महाजनच एव्हरग्रीन आहेत, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी म्हटले. यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळून तेथून निघून गेले.

 

Strengthen the booths and step into the electoral fray.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *