ती ‘अबला’ न्यायासाठी फिरते अनवाणी विषाची बाटली घेऊन!

प्रियकराने नाकारले, भोंदूबाबाने गंडविले!

नाशिक : प्रतिनिधी
‘लिव्ह इन’मध्ये चार वर्षे राहिल्यानंतर प्रियकराने लग्नाला नकार दिला. मग तिने एका भोंदूबाबाला आपबिती सांगितल्यावर या भोंदूबाबानेही तिला 83 हजारांना गंडविले. पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसलेली ही अबला अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या आधाराला गेली. आता तिला न्याय मिळण्यासाठी ‘अंनिस’ने प्रयत्न सुरू केले आहेत.

कमलाबेन नावाची साधारण तिशीतील गुजरातमधील बलसाड येथील रहिवासी असलेली ही महिला. अत्यंत गरीब परिस्थितीतील असून, ती मोलमजुरी करून पोट भरते. चार वर्षांपूर्वी तिची नाशिक येथील फुलेनगरच्या एका तरुणाशी ओळख झाली. नंतर त्यांचे प्रेम जमले. तिचा प्रियकर नाशिकमध्ये मजुरीचे काम करतो. बलसाडला ते चार वर्षे ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहिले. भूलथापा मारून त्याने चार वर्षांपासून तिला लग्नाच्या आशेवर ठेवले व शेवटी नकार दिला. तो पुढे नाशिक येथे राहू लागला. त्या दरम्यान नाशिक येथील तथाकथित आध्यात्मिक गुरू असलेल्या एका भोंदूबाबाची कमलाबेनशी ओळख झालेली होती. अघोरी पूजाविधी केला तर तुम्हा दोघांचे लग्न लागेल, असे त्या भोंदूने तिला सांगितले. त्यासाठी त्याने नाशिकला तिला बोलावून अमावास्येच्या रात्री स्मशानात अघोरी पूजाविधी केला. त्याबदल्यात तिच्याकडून वेळोवेळी 83 हजार रुपये उकळले. त्याबद्दलचा तिच्याकडे पुरावा उपलब्ध आहे. तिची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यासाठी तिने तिच्या आईचे सर्व दागिने विकले. तिने अनेकांकडून उसनवारी केली. पण एवढा खर्च करूनही गुण आला नाही. त्याचा जाब तिने भोंदूबाबाला विचारला असता आपल्या दैवी सामर्थ्याने तुला मारून टाकू, असे त्याने धमकावले.
दरम्यान, तिचा प्रियकर हा याच भोंदूबाबाचा चेला झाला. दोघे लक्ष्मीबेनच्या विरोधात गेले. आपल्याला न्याय मिळावा म्हणून ती एकटी नाशिकला आली. प्रियकराने लग्न तर दूरच, उलट तिला मारहाण केली. तिने पोलीस ठाणे गाठले. साधी तक्रार केली असता तिला फारसा चांगला अनुभव आला नाही. आपण दोन वर्षांनी लग्न करू, असे पोलिसांसमोर खोटे बोलून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. पोलीस ठाण्याच्या परिसरात ती रडत असल्याचे आणि हा अंधश्रद्धेबद्दलचा विषय असल्याचे पाहून एका पत्रकाराने तिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपर्क क्रमांक दिला. तिच्याशी बोलणे झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तिची भेट घेतली. तेव्हा तिच्या एका हातात गुजराथी भाषेतील अक्षरे लिहिलेली प्लास्टिकची पिशवी तर दुसर्‍या हातात विषाची बाटली आढळली. अधिक चौकशी करता तिने रडतरडतच सांगितले की, मला कुणाचाच आधार नाही, मला न्याय पाहिजे पण कुणीही मदत करत नाही. म्हणून मी आता विष घेणार आहे. कार्यकर्त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्याकडून बाटली हिसकावून घेतली. तिचे समुपदेशन केले व हळूहळू तिला आत्महत्येपासून परावृत्त केले व तिला पंचवटी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. गुन्हा नोंद करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने पोलिसांना निवेदन दिले. पोलिस ठाण्याच्या बाहेर झाडाखाली उभे असताना तिथे लाल मुंग्या तिच्या पायाला चावल्या कारण ती अनवाणी होती. कारण विचारले असता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी तिने शपथ घेतल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी आम्ही सोबत असल्याचे तिला आश्वस्त करून तिला चप्पल घेऊन दिली. ती नाशिकमधील फुलेनगरमध्ये एका नातेवाइकाकडे तात्पुरत्या स्वरूपात राहत आहे. नातेवाइकाची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने व त्यांना भार नको म्हणून ती एक वेळ उपाशी राहते. तिने पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रार केली हे समजले असता तिचा प्रियकर व भोंदूबाबाने तिला फोनवर धमकी दिली व शिवीगाळ केली. तिच्याकडून जबरदस्तीने सावकारी पद्धतीने पैसे दिले असल्याचे लिहून घेण्याचा व तसे नोटरी करण्याचा प्रयत्न केला. पण, कार्यकर्त्यांनी तो उधळून लावला. त्यांनी मग तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर काल रात्री त्या दोघांनी तिच्या नातेवाइकाचे
घर गाठले.
त्यांच्या हातातील सुरा पाहून प्रचंड घाबरून तिने पळ काढला. कार्यकर्त्यांनी पोलिसांशी बोलून तिला पोलीस ठाण्यात पाठविले. पण तिला काही मदत झाली नाही. कसातरी तिने एका मंदिराचा आडोसा शोधला.
रात्रभर तिने तिथेच मुक्काम केला. सकाळी उठून तिने कार्यकर्त्यांना हे सांगितले. महाराष्ट्र ‘अंनिस’चे कार्यकर्ते तिच्या राहण्यासाठी व खाण्यापिण्यासाठी तिला मदत करीत आहेत. तिच्या राहण्याची नाशिकमध्ये अशी तात्पुरती काही दिवसांसाठी सोय करण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. कुणी नाशिककर तिची सोय करण्यासाठी पुढे येणार असतील तर 9822630378 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ‘अंनिस’ने
केले आहे.

That ‘helpless woman’ wanders barefoot in search of justice, carrying a bottle of poison!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *