ईद-ए-मिलादनिमित्त इंदिरानगर पोलीस ठाण्यात बैठक

वडाळागाव : प्रतिनिधी
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच जुलूस शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी इंदिरानगर पोलीस ठाणे व जुलूस नियोजन समितीची संयुक्त बैठक झाली.
इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ईद-ए-मिलादचा जुलूस शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे आणि जुलूसाच्या नियोजनात परस्पर समन्वय राखावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत जुलूसाचा मार्ग, वाहतूक व्यवस्था, सुरक्षेच्या उपाययोजना, वीज व्यवस्था तसेच मार्गावरील अडथळे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. मौलाना जुनेद आलम, माजी नगरसेवक सुनील खोडे, महावितरणचे सहा. कनिष्ठ अभियंता विशाल पानसरे आदींनी मनोगत व्यक्त करून विविध सूचना मांडल्या.
सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर, गोपनीय शाखेचे अमोल मानकर, पो. हवा. अशोक आव्हाड, पवन परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच आसिफ शेख, रफीक शेख, लाला मदारी, इकबाल पटेल, फरिद शेख, मुश्ताक लालू, असद सय्यद, इमरान शाह आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. ईद-ए-मिलादचा उत्सव शांतता, सामाजिक सलोखा व बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Meeting held at Indiranagar Police Station regarding Eid-e-Milad.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *