शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग 3 संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षणसेवक) अशी एकूण 2,421 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरतीप्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्रधारक उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चारही विभागांतील शासकीय आश्रमशाळांतील 2,421 जागांसाठी शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू आहे. नाशिक विभागात सर्वाधिक 826 पदे असून, त्याखालोखाल ठाणे विभागात 613 पदे, नागपूर विभागात 514 पदे तर अमरावती विभागात 468 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम), माध्यमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम) आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षणसेवक) अशा विविध पदांचा समावेश आहे.
शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीमध्ये पेसा क्षेत्रातील 885 तर नॉन-पेसा क्षेत्रातील 1,536 पदांचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) नॉन-पेसा क्षेत्रामध्ये 862 जागा तर पेसा क्षेत्रामध्ये 436 जागा उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी पेसा व नॉन-पेसा क्षेत्रामध्ये अनुक्रमे 67 आणि 161 जागांवर भरती होईल. माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) नॉन-पेसा क्षेत्रामध्ये 352 तर पेसा क्षेत्रात 138 जागा उपलब्ध आहेत. माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पेसा क्षेत्रात 5 आणि नॉन-पेसा क्षेत्रात 22 जागांवर भरतीप्रक्रिया पार पडेल.
उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पेसा क्षेत्रामध्ये 251 आणि नॉन-पेसा क्षेत्रामध्ये 106 अशा एकूण 357 जागा उपलब्ध आहेत. यात मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शाखांच्या विषयांचा
समावेश आहे.

विभागनिहाय
उपलब्ध जागा
नाशिक 826
ठाणे 613
अमरावती 468
नागपूर 514
एकूण 2421

आश्रमशाळा शिक्षक भरतीप्रक्रियेत स्थानिक व आदिवासी क्षेत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. यानुसार संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी 885 तर नॉन-पेसा क्षेत्रासाठी 1,536 जागा राखीव आहेत. ही भरतीप्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलद्वारे अत्यंत पारदर्शकपणे, गुणवत्तेच्या आधारावर आणि नियमानुसारच होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
– लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

 

Mega-recruitment for 2,421 teacher posts in government ashram schools.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *