आ. सीमा हिरे यांचा उत्स्फूर्त सहभाग
सिडको : प्रतिनिधी
कानबाई माता व राणूबाई माता यांच्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त सातपूर आणि सिडको परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, देवीचा जयघोष आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या मिरवणुकीत आमदार सीमा हिरे यांनी सहभागी होत देवीचे दर्शन घेतले. तसेच महिलांसोबत फुगडी खेळत त्यांनी उत्सवाच्या आनंदात सहभाग नोंदवला.
आ. हिरे यांनी यावेळी उपस्थित महिला, भाविक आणि नागरिकांशी संवाद साधला. महिलांसोबत फुगडी खेळताना त्यांनी पारंपरिक उत्सवाचा आनंद घेतला. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे उपस्थित महिलांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कानबाई माता आणि राणूबाई माता या महाराष्ट्राच्या लोकपरंपरा आणि श्रद्धेशी जोडलेल्या देवता आहेत. या उत्सवाला समाजजीवनात विशेष महत्त्व असून, उत्सवाच्या निमित्ताने महिला एकत्र येत श्रद्धा आणि आनंद व्यक्त करतात. सातपूर आणि सिडको परिसरातील विसर्जन मिरवणुकीतही या परंपरेचे दर्शन घडले.
यावेळी आ. सीमा हिरे यांनी देवीचे दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. आपल्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. अशा उत्सवांमुळे समाजातील एकोपा आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी सांगितले. देवीच्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने सातपूर व सिडको परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात महिला, भाविक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी
झाले होते.
Immersion of Kanbai-Ranubai in the city