नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाला अवघे 20 ते 22 दिवस शिल्लक असताना शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, सिंहस्थाच्या विविध कामांसाठी ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, निर्माण झालेले खड्डे, अनावश्यक स्पीडब्रेकर, पाइपलाइन व वायरींचे जाळे आणि सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे गणरायाच्या आगमन मिरवणुकीसमोर मोठे विघ्न उभे राहिले आहे. गणेशोत्सवापूर्वी शहर व उपनगरांतील रस्ते सुरळीत करून अनावश्यक स्पीडब्रेकर हटवावेत, अन्यथा अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणीच गणेशस्थापना करण्यात येईल, असा इशारा नाशिक शहर गणेशोत्सव महामंडळाने दिला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्ती आणण्यासाठी आगमन मिरवणुकीचे नियोजन सुरू झाले आहे. मोठ्या वाहनांमधून गणेशमूर्ती आणताना रस्त्यांवरील खड्डे, अरुंद झालेली जागा, स्पीडब्रेकर आणि विविध ठिकाणी सुरू असलेली कामे अडथळा ठरण्याची शक्यता आहे. सिंहस्थाच्या कामांसाठी खोदलेले रस्ते अद्याप अनेक ठिकाणी पूर्ववत झालेले नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक भागांत रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही मार्गांवर एकेरी वाहतूक किंवा वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आधीच वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुकीला याच समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यात ठिकठिकाणी उभारलेले स्पीडब्रेकर आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मोठ्या वाहनांना वारंवार अडथळे येत आहेत.
महापालिकेकडून खड्डे बुजविल्याची आकडेवारी जाहीर केली जात असली, तरी प्रत्यक्ष शहरातील रस्त्यांवर परिस्थिती वेगळी असल्याचे गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करून खड्डे बुजवावेत, अडथळे दूर करावेत आणि अनावश्यक स्पीडब्रेकर हटवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आगमन मिरवणुकीत अडथळा निर्माण झाल्यास संबंधित ठिकाणीच गणेशस्थापना करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
येत्या 14 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. रस्त्यात खड्यांमुळे, तसेच स्पीडब्रेकरमुळे त्रासात भर पडली आहे. महापालिका खड्डे बुजविण्याचा देखावा करीत आहे. त्यामुळे गणेश मंंडळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवापर्यंत खड्डे आणि अनावश्यक स्पीडब्रेकरचा त्रास कायम राहिल्यास महामंडळाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
– समीर शेटे, अध्यक्ष, नाशिक शहर गणेशोत्सव मंडळ
Potholes and speed breakers hinder Lord Ganesha’s arrival.