‘लेक लाडकी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी

निफाड तालुक्यात 1,023 मुलींच्या खात्यावर थेट अनुदान जमा

निफाड : विशेष प्रतिनिधी
मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, तसेच त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यातील सक्षमीकरणाला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेली ‘लेक लाडकी’ योजना निफाड तालुक्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या 1,516 अर्जांपैकी 1,023 पात्र लाभार्थी मुलींच्या बँक खात्यावर थेट अनुदान जमा करण्यात आले आहे. उर्वरित 493 अर्जांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींसाठी ही योजना लागू आहे. मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. बालविवाहाला आळा घालणे, मुलींना शिक्षणापासून वंचित राहू न देणे आणि पालकांवरील शैक्षणिक भार कमी करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून अर्जप्रक्रिया व कागदपत्रांबाबत पालकांना मार्गदर्शन केले जात आहे. मदत थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होत असल्याने योजनेत पूर्ण पारदर्शकता राहिली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, मुलींच्या शिक्षणाला नवे बळ मिळत
आहे.

निफाड तालुक्यातून प्राप्त अर्जांपैकी बहुतांश मुलींच्या खात्यावर अनुदान जमा झाले आहे. प्रक्रिया सुरू असलेल्या अर्जांतील लाभार्थींनाही लवकरच लाभ मिळेल. तळागाळातील प्रत्येक गरजू मुलीपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी बालविकास प्रकल्प कार्यालय कटिबद्ध आहे.
– आरती गांगुर्डे, बालविकास प्रकल्प अधिकारी, निफाड

Effective implementation of the ‘Lek Ladki’ scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *