कोंबडे झाकण्याचा प्रयत्न

– राजेश शिरभाते
आपल्या भाषेत एक म्हण फार प्रचलित आहे. कोंबडे झाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सूर्य काही उगवायचा राहत नाही. या म्हणीचा प्रत्यय शनिवारी (दि. 22) राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या निमित्ताने आला. सध्या सत्ताधारी पक्ष आपण लोकशाहीवादी आहोत हे दाखवण्यासाठी राहुल गांधी यांना थेट विरोध करत नसले, तरी त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असतात. राजस्थानातील कोटामध्ये हे झाले. पुढे बिहारमध्ये तर त्यांनी मागितलेले मैदान एका नाचगाण्याच्या कार्यक्रमासाठी दिले. वाराणसीत त्यांच्या सभेला लोक येऊ नयेत म्हणून मैदानाच्या वाटेवर चक्क सांडपाणी म्हणजे अगदी शौचालयाचे पाणी सोडून ठेवले होते. आता पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी देताना इतक्या अटी टाकून ठेवल्या आहेत की, जेणेकरून तिथे काही गडबड होणार आहे. मात्र, सर्वच राज्यकर्ते हे विसरले आहेत की, कोंबडे झाकण्याचा प्रयत्न केला म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. जो सूर्य उगवणार आहे तो उगवणारच आहे.

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षासाठी आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांच्या सभा या काँग्रेसच्या काळात गाजलेल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांना ऐकण्यासाठी अगदी विरोधी पक्षातले तरुणही जात असत. आता मात्र देशात एक वेगळ्याच प्रकारचे राजकारण सुरू आहे. हे सुशिक्षित, वैचारिक नाही. ते अगदी ग्रामसभेतल्याप्रमाणे आहेत. अर्थात, आता अनेक गावांमध्येही राजकारण सुशिक्षित लोकांच्या हातात असल्याने तिथेही काहीसे प्रगल्भ राजकारण होताना पाहायला मिळते हा भाग वेगळा. राहुल गांधी यांच्या सभेला मिळणारा तरुणांचा आणि लोकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा भाजपाच्या पोटशुळाचे मुख्य कारण आहे की काय, अशी शंका येते. एकतर ही माणसे पैसे वा इतर कोणतीही आमिषे न देताही येतात. ती त्यांचे विचार ऐकतात. ती त्यांच्याशी थेट संपर्क साधतात. राहुल गांधी ही प्रत्येकाला सन्मान देणारी घरंदाज व्यक्ती असल्यामुळे ते लागलीच लोकांशी थेट जोडले जातात. ही विनासायास गर्दी होते कशी, हा खरा प्रश्न आहे. बरे सरकारी सुरक्षा यंत्रणा त्यांनाही नियमाप्रमाणे आहे. त्याचाही ते अतिरेक करत नाहीत. खरेतर राहुल गांधी यांच्या कुटुंबाने जे सोसले आहे त्याची कल्पनाही इतर पैशाला पासरी राजकारण करणारे करू शकत नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा साधेपणा, त्यांची बुद्धिमत्ता, उच्चशिक्षित असल्यामुळे अनेक विषयांवरचा त्यांचा अभ्यास त्याच्या जोडीला त्यांची शारीरिक तंदुरुस्ती आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, त्यांची साधी सोपी, प्रेमळ नजर. त्यातील आपलेपणा हा शिकता येत नाही. त्याचा प्रचार करता येत नाही. ती जाणीव असते आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्याबाबती एक विश्वास जनतेच्या मनात आहे.
राहुल गांधी यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच स्तरांतील लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. अगदी रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर असो, शास्त्रज्ञ असो, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ असो की, अगदी साधी कामे करून आपला चरितार्थ चालवणारा समाज असो. शिक्षक असो की विद्यार्थी असो, या सगळ्यांना त्यांच्याविषयी एक आत्मीयता आहे आणि ती नैसर्गिक आहे. ती आत्मीयता पैसे खर्च करून किंवा प्रचार मोहिमा राबवून मिळवता येत नाही. त्यांची दूरदृष्टीही लोकांनी पाहिलेली आहे. देशाच्या पुढे निर्माण होणारे सर्वच प्रश्न त्यांनी आतापर्यंत आधीच सांगितलेले आहेत. अगदी कोविड ते इंधन संकटाची जाणीव त्यांना आधीच झाली होती. सध्या त्यांनी शिक्षण पद्धतीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवरच्या जेन-झी तरुणांच्या आंदोलनात त्यांनी थेट सहभाग जरी घेतला नाही तरी त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांचे प्रश्न संसदेत मांडले. त्यांच्यावर झालेल्या क्रूर मारहाणीचा जाब विचारला. देशातील शिक्षण पद्धतीकडे लक्ष दिले पाहिजे, हे त्यांनी जाणले. अगदी कालच त्यांनी जंतर-मंतरवर आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर चालवलेल्या पॅलेट गनच्या विरोधात अखेर तक्रार घ्यायला भाग पाडले. त्यासाठी ते सहा तास एका पोलीस स्थानकासमोर बसून राहिले. वास्तविक लोकशाहीतील विरोधी पक्षनेता हा पर्यायी पंतप्रधान असतो. तरीही सामान्य विद्यार्थ्यांसाठी एक नेता उभा राहतो. स्वतः तर बोलतोच त्याचबरोबर त्यांनाही बोलायला देतो, हे त्यांचे मोठेपण आहे.
राहुल गांधींचे एक मोठेपण हे आहे ते म्हणजे की, मीच मोठा, मीच सगळ्यांचा तारणहार असा फालतू आविर्भाव ते बाळगत नाहीत. जेन-झी आंदोलनानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुलांनाही पत्रकारांसमोर बोलायला लावले. त्यांना प्रोत्साहन दिले. आजच्या मुलांच्या कामांमध्ये अगदी दैनंदिन जीवनाचा भाग असलेले उत्स्फूर्त प्रेझेंटेशन हे राहुल गांधी यांचे आणखी एक वैशिष्ट्य असते. ते एखाद्या विषयाचा इतका सखोल अभ्यास करतात की त्यानंतर त्या विषयावर आयत्या वेळेवर आलेल्या कोणत्याही प्रश्नाची ते सहज उत्तरे देतात. अशा प्रकारे पत्रकारांच्या प्रश्नांंना थेट आणि जबाबदारीने उत्तरे देणे हे साधे काम नाही. त्यासाठी अभ्यास आणि आत्मविश्वास असायला हवा.
राहुल गांधींकडे देशातील
स्वतःला आघाडीची माध्यमे असल्याचे स्वतःच सांगणार्‍या माध्यमांनी दुर्लक्ष केले आहे. ते त्यांच्या चुका शोधत राहतात. मात्र, आताचा तरुण या द्वेष पसरवणार्‍या माध्यमांच्या वाटेला जात नाही. त्याचे स्वतःचे समाजमाध्यमावरील माध्यमे सध्या उपलब्ध आहेत. याच समाजमाध्यमांनी राहुल गांधी यांना या देशाचा अगदी भावी पंतप्रधान म्हणून घोषित केले की काय, अशी शंका त्यांच्या पोस्ट वाचून येते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कोणत्याही माध्यमांनी प्रसिद्धी दिली नव्हती त्या काळात समाजमाध्यमांवर त्यांची प्रसिद्धी झाली होती. राहुल गांधींच्या प्रसिद्धीच्या मोहिमेमुळे नव्हे, तर लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी करतात, हे आता जवळजवळ सिद्ध झाले आहे. राहुल गांधींनी केवळ
स्वतःचे व्यक्तिमत्त्वच असे पुढे आणले नाही, तर काँग्रेसमध्ये सध्या चांगल्या नेत्यांची एक फळीही निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रातही अनेक तरुण चांगले नेते ना-ना करत पुढे येत आहेत. त्यांनी राहुल गांधी यांना आदर्श मानले आहे. तसेच राहुल गांधी यांनीही त्यांना सहकार्‍याचा मान दिला आहे. त्यामुळे येणारा काळ हा काँग्रेससाठी आशादायक आहे, असे म्हणायला हरकत नाही. निवडणूक आयोगाच्या विविध घडामोडींवरही या पक्षाने आता बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. केवळ प्रमुख शहरांमध्येच नव्हे, तर इतर लहान- लहान शहरांमध्येही काँग्रेसचे घरंदाज नेते आणि तळागाळातून आलेले कार्यकर्ते भारावलेले आहेत. या देशाला राहुल गांधीच योग्य न्याय आणि वातावरण देऊ शकतील त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिष्ठा वाढवू शकतील, असे आता त्यांना वाटत आहे. राहुल गांधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरूनही इतक्याच आत्मविश्वासाने आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलत असतात, हेही जगाला माहीत आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याला त्याचा मानद्यावा अशी जर एखाद्या पक्षाची संस्कृती नसेल तरी आता जनता सजग झाली आहे. जेन-झीच्या तरुणांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असे दोन्ही भान आहे. त्यांच्या हातात माहितीचे मायाजाळ आहे. त्यामुळे आता आपल्या देशाला राहुल गांधीच पुढे नेतील, अशी त्यांना खात्री पटली आहे. राहुल गांधींच्या सभांवर कितीही निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा सूर्य उगवायचा थांबणार नाही. केवळ विरोध करणार्‍यांची विकृत विचारसरणीच यातून स्पष्ट होत असल्याचे हे या देशाचे तरुण आता पुढे येऊन सांगत आहेत. हा सूर्य या देशासाठी शुभ ठरावा.

Attempting to cover the rooster

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *