भांडलो होतो, तुटलो नव्हतो..

– अमोल जगताप
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. घराच्या पुढे अंगण, बाजूला वाहणारा पाण्याचा पाट, पाटाच्या काठावरची आंब्याची झाडं, मागे थोडं खाली उतरलं की विहीर आणि या सगळ्या पसार्‍यात कायम कुठेतरी ऐकू येणारे आमच्या भावंडांचे आवाज.. हसणं, ओरडणं, भांडणं, रडणं आणि पुन्हा काही क्षणांत सगळं विसरून एकत्र खेळायला लागणं. आमची भांडणं.. आमच्या बालपणाचा हा कदाचित सर्वात साधा, पण आज सर्वात जास्त आठवणारा भाग आहे.
आम्ही भावंडं किती होतो, याची आज मोजदाद केली तर कदाचित बोटं कमी पडतील; पण तेव्हा ती संख्या कधीच महत्त्वाची वाटली नाही. घरात एकजण कमी दिसला तरी काहीतरी अपूर्णच वाटायचं आणि सगळे एकत्र जमलो की घराचा प्रत्येक कोपरा जिवंत व्हायचा. एवढी मुलं एकत्र असतील तर भांडणं होणार नाहीत, हे शक्यच नव्हतं. पण आमच्या भांडणांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना ना सुरुवात लक्षात राहायची आणि ना शेवट..! कधी एखाद्या पेरूसाठी भांडण व्हायचं. झाडावर लागलेला पेरू नेमका कोणाचा? ज्याने आधी पाहिला त्याचा? की ज्याने आधी तोडला त्याचा? हा प्रश्न आमच्यासाठी कधी कधी गावच्या पंचायतीपेक्षाही गंभीर असायचा. एखाद्याने पेरू तोडला की दुसरा लगेच म्हणायचा – मी आधी पाहिला होता! पहिला म्हणायचा – पाहिलास तू, पण तोडला मी! आणि मग त्या एका पेरूभोवती, त्या पेरूसाठी भावंडांची बैठक भरायची. त्या भांडणात मध्येच छोटी मावडी मध्येच रडायला लागली की दोन्ही भांडण करणारे स्वतःहून पेरू मावडीला देऊन टाकायचे.. बस्स.. संपलं भांडणं..
कधी खेळताना कुणी कुणाला ढकललं, कुणी आपली कपची लपवली, कुणी
सूरपारंब्या खेळताना; झाडावर चढताना पाय ओढला, तर कुणी आपली पाळी आली असताना मुद्दाम खेळ सोडला.. ही आणि अशीच भांडणाला कारणं कमी नव्हती. कारणं छोटी असायची, पण त्या क्षणी ती आमच्यासाठी जगातली सगळ्यात मोठी समस्या असायची..
तू माझ्याशी बोलू नकोस! – हे वाक्य म्हणजे अंतिम निर्णय. मग खरंच काही मिनिटं बोलणं बंद व्हायचं. पण त्या अबोलपणालाही फार आयुष्य नसायचं. समोरचा जर एखादी गंमत करत असेल, तर राग धरून ठेवणं कठीण व्हायचं. कुणी एखादं मजेशीर तोंड करून दाखवलं, की दुसर्‍याच क्षणी हसू फुटायचं. मग आधीचा राग कुठे गेला, भांडण कशावरून झालं, याचा शोध घ्यायची गरजच उरायची नाही. मात्र कधी भांडण थोडं वाढलं की घरातल्या मोठ्यांचा आवाज यायचा – काय चाललंय तुमचं? बस्स. मग तो एक प्रश्न पुरेसा असायचा. सगळे आपापल्या जागेवर. ज्याने भांडण सुरू केलं तो निरपराध चेहरा करून उभा. ज्याला मार बसला तोही शांत आणि दोघांच्याही चेहर्‍यावर असा भाव, की जणू काही आम्ही जन्मापासून एकमेकांशी गोड बोलत आलो आहोत.
आईला मात्र आमच्या या नाटकाची सगळी कल्पना असायची. ती कधी दोघांनाही समज द्यायची, नाहीतर कधी दोघांनाही कामाला लावायची- चल, आधी हे कर आणि मग भांडत बसा, असं म्हणत ती आमचा राग दुसरीकडे वळवायची. आजीच्या काळात तर भांडणं मिटवण्याची पद्धत आणखी वेगळी होती. तिच्या एका नजरेतच बरंच काही असायचं. ती फार मोठं भाषण करायची नाही. भांडणार्‍या दोघांनाही मांडीवर घेऊन फक्त एवढंच म्हणायची, – अरे, उद्या कोण कोणाचं असणार आहे? एकमेकांशिवाय कुणी नाही तुमचं. तेव्हा त्या वाक्याचा अर्थ कळायचा नाही. आज मात्र त्यातलं आयुष्य समजतं. आमच्या भांडणांमध्ये कधी कधी रडणंही असायचं. कुणी खरंच दुखावलं तर त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. मग ज्याने दुखावलं तो थोडा वेळ लांब उभा राहायचा. जवळ जायची इच्छा असायची, पण अहंकार आड यायचा. शेवटी कुणीतरी एखादं काम करून द्यायचं-चल, हे घे, किंवा हातातला एखादा पेरू त्याच्यासमोर ठेवायचा. एवढंच पुरायचं.
आम्हाला माफी मागण्यासाठी किंवा माफ करण्यासाठी मोठमोठे शब्द लागत नसत. कधी एखादी अर्धी भाकरी पुढे केली की माफी झाली. कधी पाण्याचा तांब्या आणून दिला की राग गेला. कधी खेळात पुन्हा तू माझ्या टीममध्ये ये एवढं म्हटलं की सगळं संपलं. आजच्या भाषेत याला कदाचित एोींळेपरश्र खपींशश्रश्रळसशपलश वैगरे म्हणतील. आम्हाला त्याचं नावही माहीत नव्हतं. आम्ही फक्त नाती जगत होतो.
कधी किरकोळ कारणावरून भांडण व्हायचं. आंब्याच्या मोठ्या पानांतून येणार्‍या सावलीत थोड्या वेळापूर्वी हसणारी मुलं अचानक दोन गटांत विभागली जायची. कुणी एका बाजूला, कुणी दुसर्‍या बाजूला. पण दुपारचा वारा, झाडावरची पानं आणि आजूबाजूचा निसर्ग मात्र आमच्या भांडणाकडे अगदी दुर्लक्ष करून आपलं काम करत राहायचा आणि काही वेळाने पुन्हा कोणीतरी आवाज द्यायचा – चला, आहाळात पाणी आलं! बस्स. भांडण संपलं. सगळे धावत सुटायचे. कधी काजवे पकडताना कोणाच्या हातात जास्त काजवे आले म्हणून भांडण व्हायचं. कधी काडेपेटीत कोणाला आधी काजवा ठेवायचा म्हणून. कधी विहिरीवर मोटार सुरू करायला जाताना – मी येणार अन् – नाही, मी येणार यावरून भांडण. पण कंदील हातात घेतला की भीतीने दोघे पुन्हा एकमेकांच्या अगदी जवळ चालायचे. हीच तर गंमत होती. एकच अंगण, एकच चूल, एकच पाण्याचा आहाळ, एकच विहीर, एकच आकाश आणि त्या सगळ्यात मिसळलेली कितीतरी मुलं.. म्हणून रुसणं शक्य होतं, पण तुटणं शक्यच नव्हतं. आजच्या काळात मुलांकडे स्वतःची खोली आहे, स्वतःचे खेळ आहेत, स्वतःची उपकरणं आहेत; पण कधी कधी मनात प्रश्न येतो-त्यांच्याकडे अशा भांडणानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी तितकं मोठं अंगण आहे का? आमच्या भांडणांना साक्षीदार असलेली ती झाडं अजूनही तिथेच आहेत. तो पाट अजूनही तसाच वाहत आहे. विहिरीच्या काठावरची ती पायवाट अजूनही तशीच आहे. आम्ही मुलं मात्र आता मोठी झालो आहोत. कुणी दूरवरच्या शहरांत आहे, कुणी वेगवेगळ्या खेड्यांत आहेत, कुणी सासरच्या अंगणात आहे.
कधी कधी वाटतं, पुन्हा एकदा त्या अंगणात सगळे जमावेत.. एखाद्या पेरूसाठी भांडावं.. कुणीतरी मुद्दाम दुसर्‍याची चेष्टा करावी.. कुणीतरी रागाने म्हणावं – तुझ्याशी बोलणार नाही! आणि पाच मिनिटांनी सगळ्यांनी एकत्र बसून हसायला सुरुवात करावी. कारण त्या छोट्या भांडणांमध्येही एक मोठं प्रेम दडलं होतं. तेव्हा आम्हाला वाटायचं, आपण भांडतोय. पण आज समजतंय – आम्ही भांडत नव्हतो आम्ही एकमेकांशी नातं घट्ट करत होतो. आणि म्हणूनच त्या बालपणाची आठवण झाली की मोठ्या घटनांपेक्षा मनात आधी येतात ती छोटी छोटी भांडणं रुसवे फुगवे रडणं आणि पुन्हा एकत्र हसणं. त्या क्षणांना ना फोटो होते, ना व्हिडिओ.
पण आठवणींच्या मनात त्यांनी स्वतःची अशी एक कायमची जागा करून ठेवली आहे. आजही त्या आठवणींना हात लावला की वाटतं किती श्रीमंत होतो आपण
भांडायला भरपूर माणसं होती, आणि रुसवा सोडवायला त्याहूनही जास्त प्रेम…!!

We had argued, but we hadn’t broken apart.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *