मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना जुजबी संवादात्मक मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. शिवाय, या वर्षभराच्या कालावधीत त्यांच्यावर शासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असा मोठा दिलासाही दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवल्याने त्याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
सरनाईक मराठी सक्तीच्या मुद्द्यावर अत्यंत आग्रही आणि आक्रमक होते. मात्र, भाजपचा अमराठी मतदार वर्ग नाराज होण्याची शक्यता तसेच आगामी उत्तर प्रदेश निवडणुका हे यामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे आणि सरनाईक यांच्यासाठीही हा मोठा धक्का असून, यामुळे महामुंबईतील मराठी माणूस नाराज होण्याची शक्यता आहे.
हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखालील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासनाच्या या नियमाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. मात्र, चालकांच्या वयातील भिन्नतेमुळे भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती केली होती. चालकांच्या या सकारात्मक प्रतिसादाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही सवलत जाहीर केली असून, या एका वर्षाच्या वाढीव काळात संघटना स्वतः पुढाकार घेऊन चालकांसाठी मराठी भाषेचे विशेष वर्ग आयोजित करून त्यांना भाषा शिकवणार आहेत.
Auto-rickshaw and taxi drivers granted permission to learn the Marathi language throughout the year.