मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत कामे स्थगित, पालकमंत्र्यांचे आदेश
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड), हायवे क्र. 29 चिंचखेड ते जोपूळ (ता. दिंडोरी) तसेच पाथर्डी कचरा डेपो बाधित शेतकर्यांच्या दोन दिवसांपासून करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकर्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी सुमारे 500 ते 600 शेतकरी उपस्थित होते.
25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून आपल्या घरदार, शेती आणि संसाराचे रक्षण करण्याचे साकडे घालण्यासाठी शेतकरी मुंबईकडे पायी निघाले होते. मात्र, पोलिसांनी मोर्चाला पुढे जाण्यास मज्जाव केल्यानंतर करण गायकर यांना इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले.त्यानंतर बाधित शेतकरी सहकुटुंब पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या देऊन बसले. मुख्यमंत्री किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेतकर्यांनी घेतली होती.
आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होत नाही आणि प्रश्नांवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत रिंगरोडसंदर्भातील मोजणी, भूसंपादन, जमीन खरेदी, नोटिसा अथवा शेतकर्यांवर परिणाम करणारी कोणतीही पुढील प्रशासकीय कारवाई करू नये, अशी मागणी केली. त्याची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरूनच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन अंतिम तोडगा निघेपर्यंत रिंगरोडसंदर्भातील पुढील कामे स्थगित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच शेतकर्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि बैठकीपूर्वी कोणतीही घाईघाईची कारवाई करू नये, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली असून, 28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्याने त्या दिवशी बैठक शक्य नसली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत मंत्रालयात सुमारे एक तासाची सविस्तर बैठक घेण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. आंदोलनाला सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, किसान सभा, मनसे, विविध संघटना यांचे किसान सभेचे सरचिटणीस राजू देसले यांनी आभार मानले. यावेळी या आंदोलनासाठी शेतकरी नेते नाना बच्छाव, छावा क्रांतिवीर सेनेचे शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, शुभम देशमुख आदी उपस्थित होते.
Major success for the agitation by farmers affected by the Ring Road project.