होऊ द्या खर्च; सिंहस्थ आहे!

– अश्विनी पांडे

सिंहस्थ कुंभमेळा आता वर्षभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नाशिककरांनी दिवस मोजायला सुरुवात करायला हरकत नाही. मात्र, नेमके कोणते दिवस मोजायचे, हा प्रश्न आहे. सिंहस्थाची कामे पूर्ण होण्यासाठी उरलेले दिवस की बैठका, आढावे, सादरीकरणे आणि नियोजनाच्या फेर्‍या किती बाकी आहेत, याचे? कारण सिंहस्थाचे काउंंटडाउन सुरू झाले असले, तरी प्रत्यक्ष कामांचा वेग पाहता घड्याळाचे काटे धावत आहेत आणि कामे मात्र निवांत चालली आहेत.

प्रयागराज(उत्तर प्रदेश)च्या धर्तीवर नाशिक- त्र्यंबकेश्वरसाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना झाली आणि नाशिककरांच्या अपेक्षांना नवे पंख फुटले. स्वतंत्र प्राधिकरण स्थापन झाले म्हणजे आता कामांना वेग येणार असे वाटले. पण प्रशासनाने नाशिककरांची निराशा होऊ दिली नाही. कामांचा वेग वाढण्याआधी बैठकांचा वेग वाढला. नियोजन झाले, सादरीकरणे झाली, चर्चा झाल्या, आढावे झाले आणि पुन्हा आढाव्यांसाठी बैठका झाल्या. म्हणजे सिंहस्थाच्या कामांपूर्वी नियोजनाचे नियोजन. मात्र, जोमात सुरू आहे. कदाचित पुढच्या बैठकीत बैठकांचा आढावा घेण्यासाठी बैठक कधी घ्यायची, यावरही निर्णय होईल!
सिंहस्थासाठी तब्बल 34 हजार 732 कोटींंचा प्रस्तावित खर्च आहे. त्यातील सुमारे 85 टक्के निधी कायमस्वरूपी पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. हा आकडा ऐकून नाशिककरांनी खूश व्हावेच. एवढा पैसा आणि एवढ्या मोठ्या योजना म्हणजे नाशिकचा चेहरामोहरा बदलणार, अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. पण कायमस्वरूपी पायाभूत सुविधा हे शब्द ऐकले की, नाशिककरांना सर्वप्रथम आठवतात ते कायमस्वरूपी खड्डे, कायमची वाहतूक कोंडी आणि अधूनमधून होणारे रस्त्यांचे खोदकाम!
नाशिकमध्ये रस्ता करणे, तो खोदणे, पुन्हा दुरुस्त करणे आणि काही दिवसांनी पुन्हा खोदणे, हा एक स्वतंत्र विकासचक्राचा भाग झाला आहे. एका विभागाने रस्ता केला की दुसर्‍या विभागाला अचानक त्याखाली काहीतरी टाकायचे आठवते. रस्ता पुन्हा केला की, तिसर्‍या विभागाला आठवण होते. त्यामुळे नाशिककरांना आता शहरातून प्रवास करताना गुगल मॅपपेक्षा आज कोणता रस्ता खोदला आहे? याची माहिती अधिक उपयुक्त ठरेल. कायमस्वरूपी सुविधा म्हणून खड्ड्यांना मान्यता मिळाली तर मात्र कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. याच वातावरणात सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम आयोजित करण्यात आला. 28 ते 30 ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे भक्ती, कीर्तन आणि संगीताचा त्रिदिवसीय सोहळा रंगला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. अमृताश्रम स्वामी महाराजांचे कीर्तन झाले आणि राहुल देशपांडे यांच्या अभंगांनी भक्तिरसाची मैफल रंगली. सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने असा कार्यक्रम निश्चितच चांगला. पण नाशिककरांच्या मनात प्रश्न भक्तीचा नाही, तर प्राधान्यक्रमाचा आहे. सिंहस्थाच्या आधी रस्ते, वाहतूक, पाणी, स्वच्छता, पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या की सिंहस्थाच्या आधी सिंहस्थाचा माहोल तयार करणे?
कारण ठक्कर डोममध्ये पोेचण्याआधीच नाशिककरांना वाहतूक व्यवस्थेची अभंगवारी करावी लागते. आयटीआयपासून एबीबी सर्कलपर्यंत काही वेळा 15-20 मिनिटे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. पुढे सिग्नल, त्यानंतर खोदकाम, मग खड्डा आणि पुन्हा कोंडी. या सगळ्यातून मार्ग काढून कार्यक्रमस्थळी पोेचलेला नागरिक शांतपणे अभंग ऐकू शकला तर त्याला भक्तिरसाबरोबर संयमरसाचाही पुरस्कार मिळायला हवा!
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आल्याची चर्चा झाली. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनी दर महिन्याला नाशिकला यावे म्हणजे रस्ते सुधारतील, असा मिश्कील टोला लगावला. आता नाशिककरांनी याला विकासाचे नवे मॉडेल मानायला हरकत नाही. निविदा, कामाचे आदेश, निधी, कंत्राटदार या सगळ्याची गरज काय? मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर करा आणि रस्ता आपोआप टकाटक! मात्र, सिंहस्थाच्या काळात लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री प्रत्येक रस्त्यावर येणार नाहीत. मग भाविकांचे स्वागत कोण करणार? रस्ते की खड्डे, हा प्रश्नच आहे.
सिंहस्थाच्या नियोजनावरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातही नाराजीचे सूर उमटले आहेत.
कुंभमेळ्याच्या सादरीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागल्याने सुमारे 70 नगरसेवकांनी सभात्याग केल्याची घटना समोर आली. साधू-महंतांकडूनही त्यांच्या सूचनांचा पुरेसा विचार होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. सिंहस्थ हा केवळ सरकारी अधिकार्‍यांचा कार्यक्रम नसून नाशिकच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाशी जोडलेला सोहळा आहे. त्यामुळे नियोजनात सर्वांचा आवाज ऐकू येणे आवश्यक आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण होणार आहे. म्हणजे आता वेळ हातातून निसटत आहे. ध्वज उभारण्याची तारीख ठरली आहे. आता कामांना गती देण्याची तारीख ठरवण्याची वेळ आली आहे.
नाशिककरांना बैठकींच्या बातम्या आता नको आहेत. किती बैठका झाल्या यापेक्षा किती रस्ते झाले, किती पूल पूर्ण झाले, वाहतूक किती सुरळीत झाली आणि किती कायमस्वरूपी सुविधा उभ्या राहिल्या, हे सांगण्याची वेळ आली आहे. 34 हजार 732 कोटींंचा प्रस्तावित खर्च म्हणजे नाशिकच्या भविष्यासाठी मोठी संधी आहे. हा पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला तर सिंहस्थ नाशिकच्या विकासाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. पण खर्च फक्त भव्य कार्यक्रम, जाहिराती, रोषणाई आणि उदघाटनांमध्ये दिसला आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसला नाही, तर एवढ्या मोठ्या निधीचा अर्थ काय? म्हणूनच नाशिककर म्हणताहेत होऊ द्या खर्च; सिंहस्थ आहे! पण खर्चाचा हिशेबही दिसू द्या, कामांचा वेगही दिसू द्या आणि एवढे सगळे झाल्यानंतर निदान नाशिकचा रस्ताही दिसू द्या!

Let the money be spent; it’s the Simhastha!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *