सिंहस्थातील दिरंगाई अन् पाठराखण!

– गोरख काळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम कार्यक्रमातून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांवरून विरोधकांचा समाचार घेत, सरकारी अधिकार्‍यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला. एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्याने नागरिकांचा रोष आहे. परिणामी शहरातील रस्ते कामावरून विरोधी पक्ष व नागरिकांच्या टार्गेटवर असलेल्या महापालिकेची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केल्याने अधिकार्‍यांवरील दडपण दूर झाले. याचवेळी त्यांनी कामांत पारदर्शकता जपण्याचे धडेदेखील दिले.

दरम्यान, सिंहस्थ कामांतील दिरंगाईचा फटका नाशिककरांना बसतो आहे. दोन महिन्यांपासून शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाकरेसेनेने खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश करत राज्य सरकार व महापालिका प्रशासनावर शरसंधान साधले होते. शुक्रवारी (दि. 28) सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगमचे उदघाटन करण्यासाठी मुख्यमंत्री आले असता, त्यांनी नागरिकांना सिंहस्थ कामांमुळे त्रास होत असल्याचे मान्य केले; परंतु उद्या याच कामांमुळे नाशिकची आधुनिक शहर म्हणून ओळख होणार असल्याने सिंहस्थाच्या माध्यमातून शहरात विकासाचे पर्व साधले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले.
नाशिक महापालिकेला गेल्या काही दिवसांपासून विशेषत: खड्ड्यांवरून टीकेचे धनी व्हावे लागले. सहा जणांचा अपघातात मृत्यू झाल्याने नागरिकांचा रोष पाहावयास मिळाला. विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेसेनेने त्यांचे काम चोख बजावत याबाबत महापालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांना आंदोलनासह इतर मार्गाने ते प्रश्न विचारत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री महापालिका आयुक्त, सिंहस्थ प्राधिकरण, विभागीय आयुक्त यांच्या संपर्कात सतत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मुंबईत सिंहस्थाबाबत बैठक घेत स्थानिक अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शुक्रवारी (दि. 28) मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा किती भव्यदिव्य असेल हे त्यांच्या भाषणातून दिसले. विशेषत: राज्य शासन सिंहस्थाच्या कामात किती सतर्क आहे, हे यावरून दिसले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्याने नागरिकांना त्रास होतो आहे, हे मुख्यमंत्र्यांनी मात्र प्रामाणिकपणे बोलून दाखविले, हे विशेष म्हणावे लागेल. भाजपच्या दृष्टीने सिंहस्थ आस्थेचा विषय आहे.
दरम्यान, मधल्या काळात रिंगरोड व शहरातील रस्त्यांवरून प्रशासनाविरोधात नकारात्मक वातावरण तयार झाल्याचे दिसले. विशेषत: रस्त्यांवरून राजकारण चांगलेच तापलेले दिसले. भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदेसेनेनेदेखील विरोध केला. शहरात एकूण 28 रस्तेकामांना डिसेंबरमध्ये सुरवात झाली. त्यातील काही रस्त्यांची कामे वर्षाच्या सुरवातीला झाली. मुळात प्रशासकीय म्हणजे सिंहस्थ प्राधिकरणाकडून रस्तेकामांना जी मंजुरी मिळणे अपेक्षित होते, ती वेळेत मिळाली नाही. परिणामी शहरातील रस्ते एकाच वेळी खोदून ठेवल्याने सर्वत्र अनागोंदी दिसली. क्किंबहुना ही बाब खुद्द मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आली. त्यामुळेच त्यांनी ते बोलून दाखवले.
दरम्यान आज होणारा त्रास भविष्यात शहराचा विकास वेगळ्या उंचीवर झालेला दिसेल. सिंहस्थ कामांद्वारे शहरात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. सोबतच नाशिकच नव्हे, तर संपूर्ण हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या गोदामाईच्या प्रदूषण मुक्तीचा संकल्प केल्याने हा मोठा बदल येत्या काही दिवसांत आपल्याला दिसणार आहे. कंपन्यांतील रसायनमिश्रित व शहरातील नाल्यांचे सांडपाणी थेट गोदावरीत सोडले जात असल्याने ती प्रदूषित झाली आहे. यावर मात करण्यासाठी सिंहस्थ निधीद्वारेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करून पुन्हा गोदावरीत सोडले जाणार आहे. त्यामुळे गोदावरीचा प्रवाह निर्मळ राहणार आहे. रिंगरोडसंदर्भात मोबदल्यातील दर कमी-जास्त झाल्याने यावरून शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले असून, त्यावर तोडगा काढण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, याप्रकरणी शेतकर्‍यांवर अन्याय होता कामा नये. रिंगरोडसाठी क्षेत्रबाधित करताना आडगाव क्षेत्रातील शेतकर्‍यांना चांगला दर व माडसांगवीसह दुसर्‍या परिसरातील शेतकर्‍यांना कवडीमोल दर दिला जाणार आहे. याविरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले असून, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याद्वारे नाशिक व त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार असल्याचे सांगत एकप्रकारे विकासाचे व्हिजन मांडले. खड्ड्यांवरून महापालिकेला ट्रोल केले जात होते. अधिकार्‍यांमध्येदेखील काहीसे भीतीचे वातावरण होते. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कामांबाबत दिलासा दिल्याने अधिकार्‍यांवर असलेले दडपण यामुळेे कमी होणार, हे नक्की!. फक्त कामे करताना पारदर्शकता जपा. लोकांनी शिव्या दिल्या तरी काही हरकत नाही. पण कामे गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना महापौर, आयुक्तांना त्यांनी दिल्या. 31 ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार असून, तत्पूर्वी शुक्रवारच्या भक्तिसंगम कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी करत एकप्रकारे सिंहस्थाचा शंखनाद केला आहे.

Delays and shielding during Simhastha!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *