जिल्हा ग्रंथालय संमेलनाने वाचन चळवळीला बळ; ग्रंथालय सेवकांच्या प्रश्नांंवर मंथन

– मुकुंद बाविस्कर
वाचन ही माणसाच्या जीवनाला समृद्ध करणारी आणि समाजाला प्रगल्भ करणारी एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. आजच्या डिजिटल युगात वाचनाची साधने आणि माध्यमे बदलली असली, तरी पुस्तकांचे आणि वाचनालयांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट माहितीच्या प्रचंड प्रवाहात योग्य, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती वाचकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी वाचनालयांवर अधिक वाढली आहे. वाचनालयांनी काळानुरूप बदल स्वीकारून पारंपरिक ग्रंथसंपदेसोबत डिजिटल साधने, ई-पुस्तके, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम, व्याख्याने, वाचन प्रेरणा कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने आणि चर्चासत्रे सातत्याने आयोजित करणे गरजेचे आहे.
ज्ञान, विचार, संस्कार आणि विवेक यांची जडणघडण वाचनातून होते. त्यामुळे सार्वजनिक वाचनालये ही केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजाच्या बौद्धिक विकासाची केंद्रे आहेत. हाच विचार घेऊन सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व संचालकांचे संमेलन सावानाच्या सभागृहात झाले. राज्याचे ग्रंथालय संचालनालयाचे प्र-संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके अध्यक्षस्थानी होते. यावेळी सेवानिवृत्त ज्येेष्ठ ग्रंथपाल राजेंद्र कुंभार यांनी सांगितले की, वाचनालयांच्या विकासासाठी शासनाचे सहकार्य, पुरेसा निधी, अद्ययावत ग्रंथसंपदा आणि प्रशिक्षित कर्मचारी यांची आवश्यकता आहे. यावेळी ग्रंथालय चळवळीसमोरील विविध प्रश्न, ग्रंथपालांच्या जबाबदार्‍या, सार्वजनिक ग्रंथालय कायदा, वाचनसंस्कृती, तसेच बाल वाचकांचा सहभाग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर संमेलनात मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव :
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), माविम व रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेहेते यांच्यासह माविम, कृषी विभागाचे अधिकारी आणि बचत गटांचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, रानभाज्यांमध्ये औषधी व आहाराच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक असून, त्यांचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास व संशोधन करून त्यांच्या पाककृतींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मिरवणूक :
पैगंबर जयंती अर्थात, ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त चौकमंडई येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या सुरुवातीला देशात व शहरात शांतता नांदावी, देशाची प्रगती व्हावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिमबहुल भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक मार्गावर, तसेच परिसरात आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आल्याने हा परिसर उजळून निघाला होता. मध्यरात्रीपर्यंत अनेक भागांत डीजे सुरू होते. काही उत्साही युवकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. चौकमंडई येथून दुपारी चार वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहर-एएआयतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, नायब शहर-ए-काझी एजाजउद्दीन काझी, विविध मशिदींचे इमाम, मदरशांंतील विद्यार्थी आणि हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. नाशिकरोड येथे ईद-ए-मिलादनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत विविध मंडळांचे चित्ररथ सहभागी झाले होते.
आगळावेगळा रक्षाबंधन महोत्सव :
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते त्रिमूर्ती चौक, पेठेे हायस्कूल, भाजी बाजार येथे आगळावेगळा रक्षाबंधन महोत्सव उत्साहात झाला. देशाचे रक्षण करणार्‍या जवानांपासून शहराची स्वच्छता राखणार्‍या घंटागाडी कर्मचार्‍यांपर्यंत, महापालिका कर्मचारी, रिक्षाचालक, भाजीविक्रेते, तसेच विविध कष्टकरी बांधवांना मायेची राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्याची परंपरा या उपक्रमातून जपली जात आहे. कष्टकरी घटकांप्रति सन्मान, आपुलकी आणि बंधुभाव व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजक आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. यावेळी चित्रा वाघ आणि आ. सीमा हिरे यांनी भाजीविक्रेत्या बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
पर्यावरणपूरक रक्षाबंधन :
सिंहस्थ हरितकुंभाच्या पार्श्वभूमीवर श्री आदियोगी फाउंडेशन, नाशिकच्या वतीने कलानगर येथील ओम रामेश्वरम शिवमंदिर परिसरात झाडांना निसर्गपूरक राखी बांधून अभिनव पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या उपक्रमातून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. वड, पिंपळ, कडुनिंब, रुद्राक्ष, आवळा व चाफा आदी झाडांना नारळाच्या काठ्या, रुद्राक्ष मणी, तुळशीच्या माळेतील मणी, सुतळी व मोरपीस यांपासून तयार केलेल्या निसर्गपूरक राख्या बांधण्यात आल्या. ज्यांनी आपले रक्षण केले, त्या झाडांचे आपणही रक्षण करूया, असा संदेश देत हरित नाशिक व पर्यावरणपूरक हरितकुंभासाठी लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले.
इस्कॉन मंदिरात झुलन यात्रा महोत्सव :
द्वारका परिसरातील श्री श्री राधा मदन गोपाल (इस्कॉन) मंदिरात सहा दिवसीय झुलन यात्रा महोत्सवाची श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर म्हणजेच बलराम जयंतीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. भगवान श्रीकृष्ण प्रगट झाल्याचे औचित्य साधून श्रावणात वृंदावन धाममध्ये श्री राधा-कृष्णाच्या अथांग प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा हा प्रसिद्ध झुलन महोत्सवाची सुरुवात झाली होती. महोत्सवात रोज सायंकाळी शंखनादात भगवान श्री श्री राधा मदन गोपालांच्या उत्सव मूर्तींना वेदीवरून आणून विविध रंगांच्या पानाफुलांनी सजवलेल्या विशेष झुल्यात विराजमान करण्यात आले. वृंदावनातील विविध नयनरम्य फुलांची आणि झुल्याची आकर्षक सजावट हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य असते. पारंपरिक आरतीनंतर भाविकांना भगवंतांना झोका देण्याची व विशेष प्रार्थना अर्पण करण्याची दुर्मिळ संधी लाभली. कृष्ण कीर्तनाने आणि मधुर सुरांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
समाजभूषण पुरस्कार व गुणगौरव :
जिल्हा कुंभार समाज विकास समितीतर्फे समाजभूषण पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच झाला. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार गोकुळ गिते यांनी कुंभार समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रा. तुळशीराम मोरे, पोपट जाधव, माधव बोरसे, सीताबाई देवदास कुंभार, हभप रघुनाथ चौरे, कमळाबाई शिरसाठ यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर, प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.
शंकरबाबा महाराज पालखी सोहळा :
इंदिरानगर येथील गीता आदर्श सोसायटीतील वाघ परिवाराच्या निवासस्थानी श्री सदगुरू शंकरबाबा महाराज यांचा पादुका पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. पालखीचे स्वागत तेजस वाघ परिवाराच्या वतीने करण्यात आले. सायंकाळी पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. गीता आदर्श सोसायटी येथून निघालेली पालखी मिरवणूक स्टेट बँक सोसायटी, गजानन महाराज मंदिर, महिला बँकेमार्गे काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि शंकरबाबा महाराज की जय, अशा जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. भाविकांनी पालखीचे दर्शन घेत श्रद्धेने सहभाग नोंदविला.

District Library Conference Boosts Reading Movement; Deliberations Held on Library Staff Issues

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *