द्वारका जंक्शनवरील वाहतुकीला दिलासा

मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम 15 ऑक्टोबरपर्यंत

नाशिक : प्रतिनिधी
द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाला वेग आला असून, मुंबई-धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित रस्त्याचे काम 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे
निर्देश महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्यात आले आहेत. तसेच पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड पूर्ण 13.5 मीटर रुंदीने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
द्वारका जंक्शन येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी 31 ऑगस्ट रोजी आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मागील आढाव्यावेळी दिलेल्या मुदतीनुसार मुंबई-धुळे बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची पाहणीदरम्यान नोंद घेण्यात आली.
उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या एका छोट्या भागातील स्लॅबचे काम अद्याप सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचा उर्वरित भाग वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. त्यामुळे स्लॅबचे उर्वरित काम 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्यात आले.
द्वारका जंक्शनवरील पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, काम सुरू असताना नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
याशिवाय द्वारका जंक्शन येथील पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड पूर्ण 13.5 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या मार्गावरील वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. जंक्शन परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्यास हातभार लागणार आहे.
या पाहणीदरम्यान जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थापनाचाही आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमनासाठी पोलिस विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. अतिरिक्त वाहतूक वॉर्डनची नियुक्ती करून त्यांचा प्रभावीपणे वापर करण्याच्या सूचना संबंधित पोलिस विभागाला देण्यात आल्या आहेत.
द्वारका जंक्शनवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक पोलिसांशी सातत्याने समन्वय साधावा, तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक वाहतूक नियमन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, नाशिक महापालिका, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Relief for traffic at Dwarka Junction

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *