अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून विनयभंग

आरोपीला सात वर्षांचा कारावास

सिडको : प्रतिनिधी
पंचवटी परिसरात अल्पवयीन मुलीला बिस्कीट आणि पापड्यांचे आमिष दाखवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीला तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
दंड न भरल्यास आणखी तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथील न्यायालय क्रमांक 1 मध्ये हा निकाल सुनावण्यात आला. रोहित सुर्वेशकुमार छाबरा (वय 44, रा. गोदावरीनगर, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 9 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास पंचवटीतील वज्रेश्वरीनगर येथे घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या कुटुंबाच्या ओळखीचा होता. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीला बिस्कीट आणि पापड्यांचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी केला. त्यांनी पुरावे संकलित करून आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी तसेच तपास अधिकार्‍यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या अंतर्गत आरोपीला सात वर्षांचा सश्रम कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच पीडितेला 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानभरपाई न दिल्यास आरोपीला एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर आणि आर. पी. गावित यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, कोर्ट पैरवी अधिकारी रंजना गायकवाड, पंचवटी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी सोमनाथ गावित तसेच विक्रांत नागरे यांनीही खटल्याच्या कामकाजासाठी पाठपुरावा केला.

Molestation of a minor girl by luring her

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *