रुग्णाच्या मृत्यूनंतर आयुष रुग्णालयात राडा

डॉक्टरांना मारहाण, अतिदक्षता विभागाची तोडफोड

सिडको : प्रतिनिधी
रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी पंचवटीतील आयुष रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी अतिदक्षता विभागात विनापरवानगी प्रवेश करून तेथील काचा फोडण्यात आल्या. रुग्णालयाच्या मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन जणांसह तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना सचिन जैन (वय 37, रा. प्रीती अपार्टमेंट, पंचवटी) यांच्यावर निमाणी येथील आयुष रुग्णालयात उपचार सुरू होते.
1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.21 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना मिळाल्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास सचिन जैन, जितेंद्र पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले तीन ते चार अनोळखी इसम रुग्णालयात आले.
डॉ. कृष्णा यादव यांच्या बाह्यरुग्ण विभागातील कॅबिनमध्ये प्रवेश करून संबंधितांनी गोंधळ घातला. त्यानंतर त्यांनी विनापरवानगी अतिदक्षता विभागात प्रवेश करत आरडाओरड आणि शिवीगाळ केली. कर्तव्यावर असलेले डॉ. अक्षय पाटील आणि डॉ. मिलिंद पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
तसेच रुग्णालयातील कर्मचारी दीप्तेश दोंदे, दुर्गेश बच्छाव, प्रशांत धुमाळ आणि फिर्यादी यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यानंतर अतिदक्षता विभागाच्या काचा फोडून रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले.
या प्रकरणी रुग्णालयातील परिचारक (ब्रदर) आयुष प्रवीण तायडे (वय 21) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन जैन, जितेंद्र पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे आणि परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अर्चना वाघ करीत आहेत.

Ruckus at AYUSH hospital after patient’s death

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *