सिंहस्थासाठी 84 धार्मिक-सेवाभावी संस्थांची नोंदणी

31 संस्थांकडून 5.68 कोटींच्या सुविधांची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भाविकांची सेवा करणार्‍या धार्मिक व सेवाभावी संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात 84 धार्मिक संस्थांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. क्यूआर कोड आधारित एकल खिडकी डिजिटल प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या या अर्जांची आता प्रत्यक्ष पडताळणी सुरू झाली आहे. यापैकी 31 संस्थांनी सुमारे 5 कोटी 67 लाख 85 हजार रुपयांच्या पायाभूत सुविधांची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यात भाविकांची सेवा करणार्‍या धार्मिक व सेवाभावी संस्थांना 15 लाख रुपयांपर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 19 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पात्र संस्थांना नोंदणीचे आवाहन केले होते.
नोंदणी झालेल्या 84 संस्थांमध्ये 45 संस्थानांचा सर्वाधिक सहभाग आहे. त्याखालोखाल 13 आश्रम, 12 आखाडे, सहा मंदिरे, पाच मठ, तसेच प्रत्येकी एक धार्मिक स्थळ, साधू निवास आणि अन्य संस्थेचा समावेश आहे. सर्व अर्ज सध्या ‘सबमिटेड’ स्थितीत असून, कोणत्याही संस्थेला अद्याप निधी मंजूर अथवा वितरित करण्यात आलेला नाही.
प्रत्यक्ष पडताळणीनंतर प्रस्ताव ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना संबंधित संस्था आणि त्यांच्या मागण्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे
निर्देश दिले आहेत. पडताळणीनंतर प्रशासकीय अभिप्रायासह प्रस्ताव नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहेत. प्रशासनाने उर्वरित धार्मिक व सेवाभावी संस्थांनाही ऑनलाइन नोंदणी लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

नियोजनासाठी आकडेवारी महत्त्वाची
नोंदणीकृत संस्थांकडून मिळालेल्या भाविकांच्या अंदाजाचा उपयोग सिंहस्थ काळातील गर्दी नियंत्रण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि साधुग्राम नियोजनासाठी केला जाणार आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे संस्थांची नोंदणी आणि त्यांच्या मागण्यांची प्रक्रिया पारदर्शक व परीक्षणयोग्य झाली आहे.

4.48 कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज
नोंदणी केलेल्या संस्थांनी सिंहस्थ काळात 4.48 कोटींपेक्षा अधिक भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 8.15 कोटींपेक्षा अधिक मुक्कामी भाविकांचा अंदाज नोंदविण्यात आला आहे. पंचवटीतील समस्त पाथरवट समाज मारुती मंदिर संस्थेने सर्वाधिक 3.4 कोटी एकूण भाविक आणि आठ कोटी मुक्कामी भाविकांचा अंदाज व्यक्त केला आहे.दरम्यान, पायाभूत सुविधांची मागणी करणार्‍या 31 संस्थांमध्ये क्रांतिकारी राष्ट्रसंत इंद्रदेवजी राधारास बिहारी बहुद्देशीय संस्थेने सर्वाधिक 77.1 लाख रुपयांची मागणी केली आहे.

नाशिकमधील 71 संस्था
द्विकेंद्रित सिंहस्थ नियोजनानुसार नोंदणी झालेल्या संस्थांपैकी 71 संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक तालुक्यातील 35 आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 20 संस्थांचा त्यात समावेश आहे. सिन्नर पाच, इगतपुरी चार, मालेगाव व चांदवड प्रत्येकी दोन, तर दिंडोरी, निफाड आणि कळवण येथील संस्थांनीही नोंदणी केली आहे. जिल्ह्याबाहेरील तसेच महाराष्ट्राबाहेरील 13 संस्थांनीही सहभाग नोंदविला आहे. यामध्ये शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान, प्रयागराज येथील पीठ, अहमदाबाद व छत्रपती संभाजीनगर येथील आखाडे, तसेच पुणे, ठाणे, नंदुरबार आणि जळगाव येथील संस्थांचा समावेश आहे.

 

Registration of 84 religious and charitable organizations for Simhastha.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *